आजच्या काळात युद्ध ही फक्त रणांगणावर तलवार चालवण्याची गोष्ट राहिलेली नाही, तर ती प्रगत तंत्रज्ञान, वेगवान निर्णय आणि आकाशातून होणाऱ्या तडाख्यांची जुगलबंदी आहे. अशा स्थितीत लढाऊ विमाने ही प्रत्येक देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा बनली आहेत. ती फक्त शत्रूवर हल्ला करण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण क्षेत्राची रणनीतीच बदलू शकतात.
या आधुनिक काळात विविध देशांनी त्यांच्या लष्करी सामर्थ्यासाठी अत्याधुनिक फायटर जेट्स विकसित केली आहेत. याच पार्श्वभूमीवर एरो टाईम या विश्वासार्ह अहवालानुसार जगातील 10 सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांची यादी समोर आली आहे, आणि त्यामध्ये भारताचे राफेल तसेच अमेरिकेचे एफ-35 लाइटनिंग II आणि रशियाचे एसयू-57 फेलॉन यांचा उल्लेख विशेष लक्षवेधी ठरतो.

सुखोई एसयू-57 फेलॉन
या यादीत सर्वात वर स्थान पटकावले आहे रशियाच्या सुखोई एसयू-57 फेलॉनने. त्याच्या गुप्त ऑपरेशन क्षमतांपासून ते चपळ हालचाली आणि प्रचंड वेगापर्यंत, हे विमान युद्धाच्या मैदानावर शत्रूला गाफिल पकडण्याची ताकद ठेवते. विशेष म्हणजे त्याची किंमत तुलनेत कमी असल्यामुळे रशियासाठी ते अधिक फायदेशीर ठरते.
एफ-35 लाइटनिंग II
दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे एफ-35 लाइटनिंग II हे स्टिल्थच्या बाबतीत अधिक प्रगत असून, रडारवर जवळजवळ न दिसणारे हे विमान आज 700 हून अधिक युनिट्ससह अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. त्याचे डिजाईन आणि ऑपरेशन सिस्टीम इतके प्रगत आहे की ते सहजपणे कुठल्याही शत्रूच्या हद्दीत घुसून परत येऊ शकते.
चेंगडू जे-20 मायटी ड्रॅगन
चीनने देखील चेंगडू जे-20 मायटी ड्रॅगन नावाचं स्टिल्थ फायटर विकसित केलं आहे. लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी डिझाइन केलेलं हे विमान काही प्रमाणात अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित असल्याचं सांगितलं जातं, मात्र त्याच्या क्षमतांबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
एफ-22 रॅप्टर
एफ-22 रॅप्टर हे अजूनही जगातील सर्वात गुप्त आणि गतिमान लढाऊ विमानांपैकी एक आहे, परंतु त्याच्या महागड्या किंमतीमुळे आणि मर्यादित शस्त्रवाहन क्षमतेमुळे त्याचे वापर मर्यादित राहिले आहेत.
एफ-22 रॅप्टर
बोईंग एफ-15एक्स ईगल II हे एक अत्यंत शक्तिशाली विमान आहे जे जवळपास 30,000 पौंड शस्त्रं वाहू शकते आणि त्याचा वेग 2.5 मॅकपर्यंत पोहोचतो. त्याचबरोबर एफ-16 फायटिंग फाल्कन हे बहुउद्देशीय विमान जगभरात सर्वाधिक वापरले जात असून, आजही त्यात सातत्याने सुधारणा करण्यात येतात.
सुखोई एसयू-35
सुखोई एसयू-35 आणि युरोफायटर टायफून ही दोन्ही विमाने देखील उत्कृष्ट चपळता आणि डॉगफाईट क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. युरोफायटरच्या नव्या ट्रँच 5 आवृत्तीत तर ड्रोनसह समन्वयाने काम करण्याची क्षमता जोडण्यात आली आहे.
राफेल
या यादीत अमेरिकन नौदलाचं एफ/ए-18 सुपर हॉर्नेट आणि अखेरीस भारतातलं अभिमानाचं राफेल देखील सामील आहे. राफेलची गुप्त रचना, बहुउद्देशीय मोहिमांमध्ये काम करण्याची क्षमता आणि त्याची इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ही त्याला युद्धाच्या मैदानावर एक घातक अस्त्र बनवते.
या लढाऊ विमानांच्या माध्यमातून आजचा युध्दाचा चेहरा पूर्णपणे बदललेला आहे. वेग, गुप्तता, ताकद आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेली ही विमाने केवळ शत्रूला नेस्तनाबूत करत नाहीत, तर ती राष्ट्राची ताकद, आत्मविश्वास आणि भविष्यकाळाची शस्त्रास्त्रे आहेत.