जगात मौल्यवान धातू म्हटलं की आपल्याला सर्वात आधी सोन्याचं नाव आठवतं. खासकरून भारतात तर लग्नसमारंभ, पूजाविधी आणि गुंतवणुकीचं प्रतीक म्हणून सोन्याला जे स्थान आहे, ते कोणत्याही धातूला नाही. पण आता चांदी हा धातू शांतपणे आणि सातत्याने आपली जागा भक्कम करत आहे. अनेक लोकांच्या मते चांदी ही सोन्याची स्वस्त पर्याय म्हणून पाहिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, चांदीचं महत्त्व केवळ सौंदर्यापुरतं मर्यादित नाही. खरं तर चांदी ही आजच्या डिजिटल आणि टेक्नोलॉजीच्या जगात एक अनिवार्य घटक बनली आहे. चांगली वीज आणि उष्णता वाहक क्षमता असल्यामुळे चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, सौर पॅनेल, वैद्यकीय उपकरणं, बॅटरी आणि अगदी फोटो तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे चांदीचा विचार केवळ दागिने म्हणून न करता, आपण आता तिचं औद्योगिक सामर्थ्यही लक्षात घ्यायला हवं.

चांदी उत्पादनात मेक्सिको टॉपवर
चांदीचं उत्पादन कुठे सर्वाधिक होतं, याचा विचार केला तर उत्तर तुमच्यासाठी थोडंसं धक्कादायक ठरू शकतं. कारण या यादीत पहिलं नाव सोन्याच्या बाबतीत चर्चेत नसलेल्या, पण खाण उद्योगात आघाडी घेतलेल्या मेक्सिकोचं आहे. 2023 मध्ये मेक्सिकोने जवळपास 6,400 टन चांदीचं उत्पादन केलं. ही आकडेवारी पाहता, जगभरात तयार होणाऱ्या एकूण चांदीपैकी तब्बल 24 टक्क्यांहून अधिक वाटा या एका देशाचा आहे. फ्रेस्निलो, सॉसिटो आणि सॅन ज्युलियनसारख्या मोठ्या खाणींमुळे मेक्सिकोने चांदी उत्पादनात निर्विवादपणे आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे.
मेक्सिकोच्या पावलावर पाऊल ठेवत चीन, पेरू, रशिया, चिली, ऑस्ट्रेलिया आणि पोलंडसारखे देश देखील या स्पर्धेत आहेत. विशेष म्हणजे, चीन केवळ दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक नाही, तर त्याच वेळी चांदीचा सर्वात मोठा ग्राहकही आहे. त्याच्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पेरूच्या खाणी आजही खूप सक्रिय असून, त्या ऐतिहासिकदृष्ट्या चांदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध राहिल्या आहेत.
भारतातील स्थिती
आपण भारतात चांदीचा विचार केला तर चित्र थोडं वेगळं आहे. चांदीच्या वापरात आपण अग्रेसर असलो तरी, उत्पादनाच्या बाबतीत आपण मागे आहोत. राजस्थान आणि झारखंडमध्ये काही प्रमाणात चांदीचे साठे असले तरी, देशातील बहुतेक गरजा आयात करून भागवल्या जातात. विवाह, धार्मिक विधी, भेटवस्तू आणि गुंतवणूक अशा अनेक कारणांनी भारतात चांदीला मोठी मागणी आहे. पण या मागणीनुसार उत्पादन वाढवण्याची गरज आता प्रकर्षाने भासू लागली आहे.
आजच्या काळात चांदी केवळ शोभेची वस्तू राहिलेली नाही. तिचं रूपांतर एका औद्योगिक आणि तांत्रिक आवश्यकतेमध्ये झालं आहे. भविष्यात सौर ऊर्जा, बॅटरी उत्पादन, मेडिकल उपकरणं आणि नवनवीन ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये चांदीचा वापर अधिकच वाढणार आहे. त्यामुळे ती फक्त चकाकणारी धातू नाही, तर भविष्यातील उद्योग आणि अर्थव्यवस्थेचं एक अत्यंत महत्वाचं केंद्रबिंदू ठरणार आहे.