लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी कोण होऊ शकतात डोनर?, कोणत्या नातेवाईकांना मिळते मंजूरी?; जाणून घ्या संपूर्ण नियम आणि अटी

जेव्हा एखाद्याचे लिव्हर इतके खराब होते की औषधे देखील उपयोगी राहत नाहीत, तेव्हा लिव्हर प्रत्यारोपण हा अंतिम उपाय बनतो. ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती संपूर्ण कुटुंबाच्या आशा-अपेक्षांचा आधार असते. अनेक लोकांच्या मनात याविषयी अनेक प्रश्न, भीती आणि गैरसमज असतात. विशेषतः डोनर कोण बनू शकतो आणि त्यासाठी काय अटी आहेत, याबाबत अधिक स्पष्टता असणे गरजेचे आहे.

लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे?

लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे अशी शस्त्रक्रिया, ज्यामध्ये खराब झालेला लिव्हर काढून टाकून, दुसऱ्या व्यक्तीचे निरोगी लिव्हर रुग्णामध्ये बसवले जाते. याचे दोन प्रकार असतात. एक मृत व्यक्तीचे लिव्हर(कॅडेव्हर डोनेशन) आणि दुसरे जिवंत व्यक्तीचे (लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट). भारतात अनेक वेळा जिवंत व्यक्तीकडून अर्धे लिव्हर घेतले जाते, कारण लिव्हर हे शरीरात एकमेव असे अंग आहे जे स्वतःला पुन्हा वाढवू शकते.

जिवंत व्यक्ती डोनर म्हणून लिव्हर दान करू शकतो, पण त्यासाठी काही कठोर निकष पाळावे लागतात. सर्वप्रथम, डोनर हा रुग्णाचा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. जसे की आई-वडील, भावंडे, पती-पत्नी किंवा अपत्य. कारण, अशा नात्यांमध्ये भावनिक जवळीक स्पष्ट असते आणि कायद्यानुसार तपासणीसुद्धा थोडी सुलभ होते. मात्र, काही वेळा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांकडून दान शक्य नसते. अशावेळी स्वॅप ट्रान्सप्लांटचा पर्याय घेतला जातो. म्हणजे दोन वेगवेगळ्या जोड्यांमधील एकमेकांसाठी दान करणे. याव्यतिरिक्त, रुग्णासोबत भावनिकदृष्ट्या जोडलेली पण नातेसंबंध नसलेली व्यक्तीही, विशिष्ट अटी पूर्ण करत असेल, तर लिव्हर दान करू शकते.

महत्त्वाचे म्हणजे, दान हे पूर्णपणे स्वेच्छेने असले पाहिजे. जबरदस्ती, लालच किंवा दबाव टाकून लिव्हर दान करवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि अशी परिस्थिती समोर आल्यास कडक कारवाई होते.

डोनरसाठीचे नियम आणि निकष

डोनर होण्यासाठी काही वैद्यकीय आणि कायदेशीर अटी आहेत. वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे, आणि व्यक्ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी असावी. काही आजार जसे की मधुमेह, हृदयरोग, हिपॅटायटीस बी किंवा सी, एचआयव्ही, कर्करोग असल्यास लिव्हर दान करता येत नाही. यामुळे डोनर आणि रुग्ण दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच लिव्हर दान करण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते, जेणेकरून दोघांचीही सुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकेल.

अशा प्रकारच्या मोठ्या निर्णयात भावनिकतेपेक्षा वास्तवाची अधिक गरज असते. लिव्हर दान करणे म्हणजे आयुष्य दान करणे, पण त्यासाठी पूर्ण माहिती, जबाबदारी आणि वैद्यकीय मार्गदर्शन आवश्यक आहे. प्रत्येक पाऊल शहाणपणाने उचलणे हेच योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे.

या प्रक्रियेत नियमांचे पालन करणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि संपूर्ण तयारीनंतर निर्णय घेणे हेच यशस्वी आणि सुरक्षित प्रत्यारोपणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.