शिक्षणाच्या प्रवासात असा एक टप्पा येतो, जेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं “पुढे काय?” विशेषतः बी.कॉम किंवा बी.टेक पूर्ण झाल्यानंतर. एमबीए हा पर्याय अनेकांचं लक्ष वेधून घेतो, कारण त्यातून ना केवळ ज्ञान मिळतं, तर करिअरचं दारही मोठ्या कंपन्यांपर्यंत उघडतं. पण याच मार्गावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो – कोणती पार्श्वभूमी असलेल्यांना एमबीए केल्यानंतर जास्त पगार मिळतो? बी.कॉम की बी.टेक?

हे दोन्ही अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक दुनियेतून येतात. बी.कॉम म्हणजे व्यवहारशास्त्र, अकाउंटिंग, मॅनेजमेंट या विषयांचा सखोल अभ्यास, तर बी.टेक म्हणजे गणित, कोडिंग, मशीन आणि तंत्रज्ञानाशी जोडलेलं ज्ञान. हे वेगळेपण पुढे एमबीए करताना आणि त्यानंतर नोकरीच्या बाजारातही जाणवायला लागतं.
बी.कॉम + एमबीए
जर तुम्ही बी.कॉम नंतर एमबीए केलं असेल, तर तुमचा झुकाव प्रामुख्याने फायनान्स, एचआर किंवा मार्केटिंगकडे असतो. सुरुवातीला अशा क्षेत्रांमध्ये वार्षिक पगार 3 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असतो. मात्र अनुभव, कौशल्यं आणि नेटवर्किंग वाढल्यानंतर तो 10 ते 15 लाखांपर्यंत सहज पोहोचतो. मोठ्या कॉर्पोरेट्स, बँका, आणि कन्सल्टिंग फर्म्समध्ये या पार्श्वभूमीची नेहमीच गरज असते.
बी.टेक + एमबीए
पण बी.टेकच्या विद्यार्थ्यांची गोष्ट थोडी वेगळी आहे. एमबीए केल्यानंतर, बी.टेक ग्रॅज्युएट्स मुख्यतः टेक मॅनेजमेंट, ऑपरेशन्स किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये जातात. तिथं त्यांच्या तांत्रिक ज्ञानाला व्यवस्थापनाची जोड मिळते, ज्यामुळे त्यांची बाजारातली किंमत वाढते. सुरुवातीला 4 ते 7 लाख रुपयांचा पगार असतो, पण अनुभवी उमेदवार 15 ते 20 लाखांपर्यंत पगार मिळवतात. काही केसेसमध्ये त्याही पुढे जातात.
एका आकडेवारीनुसार, बी.टेक + एमबीए केलेले उमेदवार हे कंपन्यांना अधिक आवडतात. कारण त्यांच्याकडे तांत्रिक आणि व्यवसायिक दोन्ही प्रकारचं कौशल्य असतं. अशा प्रोफाइल्सना अनेक स्टार्टअप्स, आयटी कंपन्या, आणि मोठे ब्रँड्स प्राधान्याने नियुक्त करतात. हेच कारण आहे की, अनेक बी.टेक पार्श्वभूमीचे एमबीए व्यावसायिक दरवर्षी 20 ते 25 लाखांचं पॅकेज मिळवतात.
मात्र याचा अर्थ असा नाही की बी.कॉम + एमबीए हे कमी प्रभावी आहे. आर्थिक क्षेत्रात, बँकिंग, कन्सल्टिंग आणि फाइनान्शियल अॅनालिसिसमध्ये बी.कॉमच्या पार्श्वभूमीला मोठा मान आहे. 5-10 वर्षांनंतर या प्रोफाइल्ससुद्धा 12 ते 15 लाखांचा पगार कमवतात, फक्त थोडा वेळ आणि अनुभव आवश्यक असतो.
कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर?
शिकणं आणि कमावणं या दोन्ही गोष्टी कोणत्या कोर्सनं नाही, तर तुमच्या दृष्टिकोनानं ठरतं. बी.टेक अधिक तांत्रिक असल्यामुळे मेहनतही जास्त लागते, तर बी.कॉम तुलनेत थोडा सुलभ असतो. मात्र एमबीए दोन्हींसाठी एकसमान आव्हान देणारं असतं.
भविष्यातील ट्रेंड बघितल्यास, तंत्रज्ञानाचं वर्चस्व वाढत चाललं आहे. त्यामुळे बी.टेक + एमबीए करणाऱ्यांना पुढे खूप संधी आहेत. पण जर तुम्हाला व्यवसायिक व्यवस्थापन, आर्थिक विश्लेषण, किंवा मानवी संसाधन या गोष्टी खऱ्या अर्थाने भावत असतील, तर बी.कॉम + एमबीए तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.