जगाच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या शर्यतीत एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, हवाई संरक्षण प्रणाली हे कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षिततेचं कणखर कवच बनलं आहे. आंतरराष्ट्रीय तणाव, वाढती दहशतवादाची धास्ती आणि आधुनिक युद्धपद्धतींमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका सतत वाढत असताना, जगभरातील देश आपली एअर डिफेन्स सिस्टीम अधिकाधिक बळकट करत आहेत. या शर्यतीत भारताने मोठी झेप घेतली असून, त्याच्याकडे आता जगातील सर्वात प्रभावशाली हवाई संरक्षण प्रणाली मानली जाणारी एस-400 ट्रायम्फ आहे.
एस-400 ट्रायम्फ

एस-400 ट्रायम्फ ही रशियाने तयार केलेली आणि भारताने खरेदी केलेली प्रणाली आहे. तिची खासियत म्हणजे ती सुमारे 400 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या कोणत्याही हवाई धोक्याचा मग ते फायटर जेट्स असोत, बॅलिस्टिक मिसाईल्स असोत किंवा ड्रोन क्षणार्धात नायनाट करू शकते. भारताने ही प्रणाली चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांच्या पार्श्वभूमीवर स्वीकारली असून, ती सध्या देशाच्या प्रमुख भागांवर तैनात करण्यात आली आहे.
टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स
या यादीत अमेरिकेचा थाड म्हणजेच टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम देखील तितकीच प्रभावी मानली जाते. ती खास बॅलिस्टिक मिसाईल्सना पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी उंच पातळीवर अडवण्याची क्षमता ठेवते. या सिस्टीमचा वापर अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युएई सारख्या देशांमध्ये केला जातो.
आयर्न डोम
इस्रायलच्या आयर्न डोमचा उल्लेख केल्याशिवाय कोणतीही एअर डिफेन्स चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. छोट्या अंतरावरून येणाऱ्या क्षेपणास्त्र किंवा रॉकेट्सना क्षणात हवेतच उडवण्याची क्षमता असलेल्या या प्रणालीने हमास आणि हिजबुल्लाहसारख्या दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड दिलं आहे. भारत-इस्रायलच्या संयुक्त सहकार्याने तयार झालेली ‘बराक 8’ सिस्टीम याच टप्प्यावर येते. ती हेलिकॉप्टर, विमाने आणि समुद्रातून येणाऱ्या मिसाईल्सना अचूक लक्ष्य करत हवाई व नौदल सुरक्षेसाठी उपयोगी पडते.
एजिस कॉम्बॅट सिस्टीम
अमेरिकेची आणखी एक प्रभावी प्रणाली म्हणजे एजिस कॉम्बॅट सिस्टीम. ही प्रणाली विशेषतः युद्धनौकांमध्ये बसवलेली जाते आणि ती एकाच वेळी अनेक प्रकारच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देऊ शकते. चीनची एचक्यू-9 प्रणाली एस-300 वर आधारित असली तरी तिच्या प्रभावीतेबाबत जागतिक स्तरावर शंका घेतली जाते, विशेषतः लांब पल्ल्याच्या अचूकतेबाबत.
‘नासाम’
अमेरिकेचीच आणखी एक उल्लेखनीय प्रणाली म्हणजे ‘नासाम’ नॅशनल अॅडव्हान्स्ड सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम. ही प्रणाली वॉशिंग्टन डीसीसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करते. ती अचूकता आणि जलद प्रतिसाद देण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते.
डेव्हिड स्लिंग
इस्रायलच्या डेव्हिड स्लिंग या प्रणालीचा उद्देश थोडा वेगळा आहे. ती मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. शेजारी देशांकडून येणाऱ्या संभाव्य मिसाईल हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावते.
यादीमध्ये पाकिस्तानचा देखील उल्लेख केला जातो, कारण त्यांच्याकडे चायनीज आणि स्वतः विकसित केलेल्या काही एअर डिफेन्स प्रणाली आहेत, मात्र त्या कार्यक्षमतेच्या बाबतीत भारताच्या तुलनेत मागे आहेत.