तुम्ही आयुष्यात मेहनतीने कमावलेली संपत्ती, बँकेतील ठेवी, विमा, गुंतवणूक यावर तुमचा हक्क असतोच, पण तुमच्या निधनानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. विशेषतः जेव्हा अचानक काही घडतं आणि कुटुंबाला कायदेशीर किचकट प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अशा वेळी “नामनिर्देशित व्यक्ती” म्हणजे नेमकं काय? ती तुमच्या मालमत्तेची मालकीण होते का? याबद्दल स्पष्ट माहिती असणं फार गरजेचं आहे.
“नामनिर्देशित व्यक्ती” म्हणजे कोण?

सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, “नामनिर्देशित व्यक्ती” ही संपत्तीची मालक नसते, तर ती फक्त एक विश्वस्त म्हणजे caretaker असते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचं बँक खातं असेल आणि त्यात त्याने आपली पत्नी किंवा मुलगा यांचं नाव नामनिर्देशित केलं असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर बँक त्या व्यक्तीकडे रक्कम सुपूर्त करते. पण याचा अर्थ असा नाही की ती रक्कम त्यांची स्वतःची होते. त्यांना ती संपत्ती किंवा रक्कम कायदेशीर वारसांमध्ये वाटावी लागते.
खास करून कोरोनासारख्या संकटाच्या काळात अनेक कुटुंबांना असे अनुभव आले की, मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे मिळवण्यासाठी किती धावपळ करावी लागते, किती कागदपत्रं द्यावी लागतात. त्यामुळे बँकांकडून नामनिर्देशित व्यक्तीचं नाव मागितलं जातं. हे नाव असणं ही केवळ सोयीची व्यवस्था असते. ती संपत्ती नेमकी कोणाची आहे, याचा निर्णय मात्र वेगळ्या कायदेशीर निकषांवर होतो.
मृत्युपत्रामध्ये वारसदाराचा उल्लेख असेल तर…
कायद्यानुसार, जर मृत व्यक्तीने मृत्युपत्र लिहिलं असेल आणि त्यात विशिष्ट वारसाचा उल्लेख केला असेल, तर त्या मृत्युपत्रात नमूद केलेला वारसच त्या मालमत्तेचा अधिकृत हक्कदार ठरतो. आणि जर मृत्युपत्रच नसेल, तर वारसा कायद्यानुसार मालमत्तेचं वाटप केलं जातं.
कुठेही नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे मालक असा गैरसमज नसावा. बँक खाती, एफडी, विमा, म्युच्युअल फंड, डिमॅट, लॉकर, EPF या सर्व ठिकाणी नामनिर्देशित व्यक्ती ही एक ‘काळजीवाहू’ असते. ती व्यक्ती संबंधित रक्कम प्राप्त करून नंतर ती योग्य कायदेशीर वारसांकडे सुपूर्त करायला बांधिल असते.
EPF मधील नियम
EPF च्या बाबतीत थोडी वेगळी बाब आहे. EPF मधून मिळणारी रक्कम नामनिर्देशित व्यक्तीलाच दिली जाते. इथे कंपनी आणि सरकारही त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डमध्ये ठेवतं. म्हणून EPF मध्ये नामनिर्देशित करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
गृहनिर्माण संस्थाचे नियम
मालमत्तेच्या बाबतीत मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्था थोडासा वेगळा दृष्टिकोन ठेवतात. तुम्ही जरी फ्लॅटसाठी कोणाला नामनिर्देशित केलं असलं, तरीही मालकी हक्क त्यांच्याकडे सरळ जात नाही. संस्था फक्त त्यांना शेअर्स हस्तांतरित करते. त्या व्यक्तीने मग पुढे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकी हस्तांतर करावी लागते.
विमा नियम
विमा कंपन्यांच्या संदर्भात, 1939 च्या विमा कायद्याच्या कलम 39 नुसार, कंपनी पॉलिसीतील नामनिर्देशित व्यक्तीला पैसे देते. पण त्यानंतर ती रक्कम कायदेशीर वारसांमध्ये वाटली जाते. जर मृत्युपत्रात त्या व्यक्तीचाच उल्लेख असेल, तर ती रक्कम तिचीच राहते.
या सगळ्या बाबी ऐकताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घ्यावी लागते, नामनिर्देशित व्यक्ती ही आपोआपच संपत्तीची मालक होत नाही. त्यामुळे मृत्युपत्र लिहून ठेवणं, आणि त्यात स्पष्ट उल्लेख करणं, ही आजच्या काळात फारच आवश्यक गोष्ट आहे.
तसंच, तुम्हाला तुमच्या खात्यांमध्ये नामनिर्देशित व्यक्ती बदलायची असल्यास ते सहज शक्य आहे. तुम्ही कधीही तुमच्या बँकेला किंवा संबंधित संस्थेला कळवून नाव बदलू शकता. पण हे लक्षात ठेवा, मृत्युपत्र आणि नामनिर्देशित व्यक्ती वेगळ्या गोष्टी आहेत मृत्युपत्र कायद्याने अधिक प्रभावी मानलं जातं.