इतिहासाच्या पानांमध्ये अनेक राजे भेटतात – काही युद्धांसाठी प्रसिद्ध, काही सत्तेसाठी, आणि काही शौर्यासाठी. पण फार थोडे असे राजे असतात जे आपल्या प्रजेच्या सुखासाठी आपली संपत्ती, वैभव आणि अगदी दागदागिनेही अर्पण करतात. अशा एका महान राजाची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या राजेशाहीपेक्षा प्रजेचं कल्याण अधिक महत्त्वाचं मानलं. हे होते म्हैसूरचे राजर्षि श्री कृष्णराज वोडेयार चतुर्थ.

राजर्षि श्री कृष्णराज वोडेयार
1902 ते 1940 या कालखंडात म्हैसूरवर राज्य करणाऱ्या या राजाने राज्यकारभार केवळ अधिकार म्हणून नाही, तर एक जबाबदारी म्हणून स्वीकारला होता. त्यांना ‘राजर्षी’ म्हणजे संत राजा का म्हटले जात असे, यामागे अनेक कारणे आहेत. त्यांचं हृदय हे नेहमी आपल्या प्रजेच्या वेदनांना, गरजांना आणि स्वप्नांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्यांच्या डोळ्यांत राज्याच्या वैभवापेक्षा लोकांच्या घरातला अंधार अधिक ठळक दिसत असे.
त्या काळात म्हैसूर आणि आसपासच्या गावांमध्ये अंधार दाटलेला होता. ना वीज, ना पुरेसं पाणी. गावकऱ्यांचे जीवन अशा अंधारात आणि असहायतेत जात होते. शेतीसाठीही पाण्याचा मोठा प्रश्न होता. हे दृश्य पाहून राजा व्यथित झाले. त्यांनी ठरवलं आता या अंधाराचा अंत झाला पाहिजे. त्यांनी आपल्या सल्लागारांबरोबर चर्चा केली आणि निर्णय घेतला कावेरी नदीवर एक भव्य धरण बांधायचं. ज्याचं नाव नंतर पडलं कृष्णराज सागर, म्हणजेच केआरएस धरण.
केआरएस धरण
मात्र ही कल्पना जितकी उदात्त होती, तितकीच महागडीसुद्धा होती. लाखो रुपयांची गरज होती. आणि तेव्हा राज्याच्या तिजोरीत ती रक्कम नव्हती. हीच वेळ होती जिथे राजा कृष्णराजांनी आपल्या राजेशाहीपणाची खरी ओळख दाखवली. त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दागिन्यांची नीलामी केली. हिरे, माणकं, मोती… सर्व काही विकून त्यांनी आपल्या लोकांसाठी हा प्रकल्प उभा केला.
1932 मध्ये जेव्हा हे धरण पूर्ण झाले, तेव्हा केवळ पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर वीज निर्मितीचंही एक नवं पर्व सुरू झालं. म्हैसूरच्या गावांमध्ये पहिल्यांदाच वीज पोहोचली. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही लोकांच्या घरांतला अंधार हटला. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळू लागलं आणि त्यांचे जीवन नव्याने फुलू लागले.
पण या राजाने फक्त धरण बांधून थांबला नाही. त्यांनी म्हैसूरमध्ये पहिल्या नियोजित शहराचा आराखडा उभारला. शाळा, रुग्णालये, रस्ते – सगळीकडे विकासाची बीजे पेरली. त्यांच्या काळात म्हैसूरने एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि प्रगत राज्य म्हणून ओळख मिळवली.