जगात पहिल्यांदा जैविक शस्त्र कोणी वापरले?, सध्या कोणत्या देशांकडे आहेत जैविक शस्त्र? धक्कादायक माहिती समोर!

Published on -

कधी काळी युद्ध म्हणजे समोरासमोर उभं राहून तलवारी, बंदुका यांचा मारा… पण आजच्या काळात युद्धाचं स्वरूपच बदललं आहे. आता शत्रूचा पराभव करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळांमध्ये घडणारी रणनीती अधिक प्रभावी ठरत आहे. विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आता अशा प्रकारची शस्त्रं विकसित केली जात आहेत, जी समोर दिसतही नाहीत, पण संपूर्ण देशाचा नाश करू शकतात, त्यांनाच आपण जैविक शस्त्रे म्हणतो. ही शस्त्रे इतकी धोकादायक आहेत की एकदा का ती पसरली, की त्यांना थोपवणं जवळपास अशक्य होतं. आणि म्हणूनच, जगाच्या सुरक्षिततेसाठी ही एक गंभीर चिंता बनली आहे.

जैविक शस्त्र म्हणजे काय?

जगात सर्वप्रथम जैविक शस्त्रांचा वापर 14व्या शतकात झाल्याचा इतिहास सांगतो. त्या काळी तातार सैन्याने क्रिमियामधील काफा शहराला कमकुवत करण्यासाठी प्लेगने मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह शहराच्या भिंतींवरून फेकून दिले. ही घटना होती जैविक युद्धाचं पहिलं भयावह उदाहरण. पुढे आधुनिक काळात, पहिल्या महायुद्धात जर्मनीने गुप्त पद्धतीने अँथ्रॅक्स आणि ग्लँडर्ससारख्या जैविक विषाणूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला. हे प्रयोग लहान स्वरूपात होते आणि फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते एक नवे युद्धशस्त्र म्हणून पुढे येणार असल्याची चाहूल देऊन गेले.

जसजशी काळाची पावलं पुढे सरकत गेली, तसतसं या जैविक शस्त्रांचं स्वरूप अधिक विकसित होत गेलं. माध्यमांच्या मते, प्लेग, टायफॉइड आणि इतर विषाणूंना शस्त्र म्हणून वापरण्याचे प्रयत्न रशिया आणि जपानसारख्या देशांनी केल्याचेही नोंद आहे. हे बघून जगाने याचा धोका ओळखला आणि 1972 मध्ये जैविक शस्त्र करार म्हणजेच BWC स्थापन करण्यात आला. हा करार मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, कारण त्याने जगभरातील देशांना या घातक प्रयोगांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

भारताने केलाय का जैविक शस्त्रांचा वापर?

पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरही अनेक देश अजूनही गुप्तपणे जैविक शस्त्रांच्या चाचण्या करत असल्याची शंका व्यक्त केली जाते. अमेरिका, रशिया, चीनसह सुमारे 17 देशांनी कधी ना कधी याप्रकारच्या शस्त्रांवर काम केल्याचं मान्य केलं आहे. यामध्ये भारताचं नाव मात्र नाही. भारताने कधीही जैविक शस्त्रांचा वापर केला नाही आणि अशा प्रकारच्या युद्धशक्तीपासून दूर राहण्याचं धोरण कायम ठेवलं आहे.

कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर चीनकडे अनेक संशयाचे बोट दाखवले गेले. अनेक देशांनी हे देखील म्हटलं की हा विषाणू जैविक प्रयोगशाळेतून पसरला असावा. मात्र आजपर्यंत यावर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित झाली, कोणताही विषाणू जर जैविक शस्त्र म्हणून वापरला गेला, तर तो केवळ एखाद्या देशाचं नव्हे तर संपूर्ण मानवतेचं अस्तित्व संकटात टाकू शकतो.

कोरोना काळात जगाने अनुभवलेली असहाय्यता, मृत्यूचं तांडव आणि अर्थव्यवस्थेचं कोलमडलेलं चित्र हे सगळं पुरेसं आहे हे समजण्यासाठी की जैविक शस्त्रांचा धोका किती भयावह असू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!