विमानप्रवास हा खऱ्या अर्थाने रोमांचक असतो, पण त्याच वेळी काहींना यामुळे शारीरिक त्रासही होतो. विशेषतः कान बंद होणे, वेदना जाणवणे किंवा कानात ‘पॉप’ आवाज होणे. हा त्रास अनेकांना टेक-ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होतो. पण ही समस्या का होते आणि ती टाळण्यासाठी काय करता येईल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जेव्हा विमान वेगाने वर जाते किंवा खाली येते, तेव्हा बाह्य वातावरणातील हवादाब झपाट्याने बदलतो. आपल्या कानातील “युस्टाचियन ट्यूब” ही एक बारीक नळी असते जी मधल्या कानाला घशाशी जोडते. हिचं काम म्हणजे कानाच्या आत-बाहेरचा दाब संतुलित ठेवणं. पण जर ही ट्यूब योग्य वेळेला उघडली नाही, तर कानात दाब साचतो आणि बंद झाल्यासारखं वाटतं.
Airplane Ear म्हणजे?
या अवस्थेला “विमानाचे कान” (Airplane Ear) असं म्हटलं जातं. काहींना सौम्य अस्वस्थता होते तर काहींना तीव्र वेदनाही होतात. आवाज कमी ऐकू येणे, कानात गूंज, जडपणा, चुरचुर आवाज, अशा लक्षणांचा अनुभव येतो. काही वेळा यामुळे श्रवणशक्ती तात्पुरती कमी होऊ शकते, आणि दुर्लक्ष केल्यास कानाच्या पडद्यावर परिणाम होऊ शकतो.
लहान मुलं, ज्यांना सर्दी, सायनस, किंवा ऍलर्जी असते, त्यांना या समस्येचा धोका अधिक असतो. झोपेत असताना युस्टाचियन ट्यूब अधिक बंद राहू शकते, त्यामुळे टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी झोपणे टाळले पाहिजे.
उपाय काय?
सुदैवाने, काही सोपे उपाय यामुळे आराम देऊ शकतात. च्युइंग गम चघळणं, जांभई देणं, काही चावणं, पाणी पिणं यामुळे ट्यूब उघडते. नाक बंद करून श्वास थोडासा झटकेने सोडल्यानेही आराम मिळतो. तसेच, नॉइज कॅन्सलिंग इअरफोन किंवा इअरप्लग वापरल्यास कानावरील दाब कमी होतो.
उड्डाणानंतरही त्रास राहिल्यास, जसे की वेदना, ऐकण्यात अडचण किंवा कानातील जडपणा, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. कारण कधी कधी कानाच्या पडद्याला नुकसान होण्याचा धोका असतो.