रामायण ही केवळ एक युद्धकथा नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील लढाईची एक अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवृत्त करणारी अनुभूती आहे. याच रामायणात एक प्रसंग आहे, जो आपल्या मनाला थेट भिडतो, जेव्हा भगवान राम स्वतःच्या शत्रूचे ज्ञान स्वीकारतात. रावणाचा पराभव झाल्यानंतर, जेव्हा त्याचा प्राण शरीरात शिल्लक होता, तेव्हा रामाने आपल्या लाडक्या धाकट्या भावाला, लक्ष्मणाला रावणाकडे पाठवले होते शिकण्यासाठी.

रामायणातील ‘तो’ प्रसंग
हे ऐकून अनेकजण चकीत होतील, की रावण, जो सीतेचे अपहरण करणारा आणि राक्षसी वृत्तीचा राजा होता, त्याच्याकडे ज्ञान मिळवण्यासाठी का जावे? पण रामाला रावणात फक्त पापं दिसत नव्हती. त्यांना त्याच्या कर्मांमागचं ज्ञान, तपश्चर्येने मिळवलेलं विद्वत्तेचं सामर्थ्य आणि त्याच्या आयुष्याच्या अनुभवांचं गूढही समजत होतं. रावण हा एक सामान्य राक्षस नव्हता. तो वेद, उपनिषदे, ज्योतिष, आयुर्वेद यांचा अभ्यासक होता आणि महादेवाचा अखंड भक्त होता. त्यामुळे, शत्रू असूनही, त्याच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी त्याच्याकडून शिकणं रामाला महत्त्वाचं वाटलं.
लक्ष्मणाने सुरुवातीला थोड्या गर्वाने रावणाच्या डोक्याजवळ उभं राहून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण रावण मौन राहिला. तेव्हा रामाने लक्ष्मणाला समजावलं “ज्ञान मिळवायचं असेल, तर नम्रतेनं, अहंकार न ठेवता शरण जावं लागतं. शत्रू असला तरी त्या क्षणी तो गुरु असतो.” या सल्ल्यानंतर लक्ष्मणाने रावणाच्या पायाजवळ बसून त्याचं अंतिम ज्ञान ऐकलं.
रावणाने सांगितल्या 3 अमुल्य गोष्टी
त्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला तीन अमूल्य गोष्टी सांगितल्या. त्याने म्हटलं, “जी चांगली गोष्ट आहे, ती आजच करावी. कारण उद्या ती संधी असणारच याची खात्री नाही. वाईट गोष्ट शक्य तेवढी लांबवावी. कारण ती वेळ कधीच चांगली नसते. आणि सर्वात महत्त्वाचं, शत्रू कधीही दुर्लक्ष करण्यासारखा नसतो, कारण तो कधीही तुमचं नुकसान करू शकतो.”
या तीन गोष्टी रावणाने एका पराजित योद्ध्याच्या भूमिका नसून, एका तटस्थ विचारवंताच्या भूमिकेतून सांगितल्या. आणि हेच रामाने ओळखलं होतं. त्यांना ठाऊक होतं की पराभवाने माणूस संपत नाही, तर त्या पराभवामागचं शहाणपण जर स्वीकारलं, तर त्यातून संपूर्ण समाज शिकू शकतो.