अंतराळात एकदा का माणूस पोहोचला, की त्याच्या शरीरात असे काही बदल होतात, जे पृथ्वीवर शक्यच वाटत नाहीत. हल्ली भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं नाव देशभर गाजतंय. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले पहिले भारतीय बनले आहेत आणि त्यांच्या या यशामुळे पुन्हा एकदा अंतराळातील मानवी जीवनाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातलाच एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो “अंतराळवीरांचं वजन तिथे कमी कसं होतं?”

शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनऊचे असून, एक लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी 15 वर्षं आकाशात भराऱ्या घेतल्या. आता ते ‘अॅक्सिओम-4’ या खास अंतराळ मोहिमेत सामील झाले आहेत. परंतु त्यांच्यासारखे अंतराळवीर जेव्हा दीर्घकाळासाठी पृथ्वीबाहेर राहतात, तेव्हा त्यांच्या शरीराला जे परिणाम भोगावे लागतात, ते सामान्य माणसाला कल्पनाही करता येणार नाहीत.
वजनात घट होण्यामागील कारण
सगळ्यात मोठा बदल म्हणजे वजनात घट. आणि ही घट म्हणजे केवळ आकड्यांतील बदल नाही, तर शरीराच्या अंतर्गत रचनांमध्ये होणारा हळूहळू घडणारा मोठा परिणाम आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा अभाव. पृथ्वीवर आपल्याला अन्नाची चव कशी जाणवते? कारण त्याचा वास आपल्या नाकापर्यंत पोहोचतो. पण अंतराळात शून्य गुरुत्वामुळे हे शक्य होत नाही. वास न आल्यामुळे भूक लागण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या मंदावते. आणि जेव्हा खाण्याची इच्छा कमी होते, तेव्हा शरीराला आवश्यक तेवढं पोषणही मिळत नाही.
दररोज 2 तास व्यायाम
शिवाय, अंतराळात राहणं म्हणजे एका स्थिर जागी हवेत तरंगत राहणं. इथे शरीराला काही ओझं उचलावं लागत नाही, चालावं लागत नाही, अगदी उभं राहावं लागत नाही. अशा स्थितीत हाडं आणि स्नायूंवर ताणच येत नाही.
म्हणूनच हाडं हळूहळू नाजूक होतात, स्नायू सैलसर होतात आणि त्याचा सरळ परिणाम वजनावर होतो. हे सगळं टाळण्यासाठी अंतराळवीरांना तिथेही एक काटेकोर व्यायाम दिनक्रम पाळावा लागतो. दररोज दोन तास व्यायाम हा त्यांच्यासाठी गरजेचा असतो, फक्त तंदुरुस्त राहण्यासाठी.