हिंदू संस्कृती ही प्राचीन आणि अत्यंत भावनिक रचनेवर आधारित आहे, जिथे मृत्यूसुद्धा अंतिम नसून एक नवीन प्रवासाचे प्रारंभ मानले जाते. आपण खूप पूर्वीपासून पाहत आलो आहोत की, अंत्यसंस्कारावेळी नेहमी पांढरे कपडे घातले जातात. हिंदू परंपरेतील अंत्यसंस्काराच्या वेळचा हा ‘पांढरा’ रंग, केवळ परिधानासाठीचा नसतो, तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असतो. जेव्हा एखादा जवळचा माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो, तेव्हा आपण केवळ शोक करत नाही, तर त्याच्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी आपली सगळ्यात निर्मळ शुभेच्छा देतो. आणि त्या क्षणी, आपलं शरीरही एक प्रकारे अशाच पवित्र भावनेनं लीन झालेलं असतं , म्हणूनच हे पांढरे वस्त्र घातले जातात.

सनातन धर्मात मृत्यूला शेवट मानलं जात नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात मानली जाते. आपला आप्तस्वकीय जेव्हा या जगातून निघून जातो, तेव्हा आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून शेवटच्या विधी करतो. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. यात प्रत्येक विधीमागे काही ना काही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचार असतो. जसं की अंत्यसंस्काराच्या वेळी पांढऱ्या कपड्यांचा वापर.
पांढऱ्या रंगाचे महत्व
पांढरा रंग हा हिंदू संस्कृतीत शुद्धतेचं, साधेपणाचं आणि शांततेचं प्रतीक आहे. या रंगात कुठलाही आभास नाही, कुठलीही सजावट नाही. मृत्यू हीदेखील अशीच एक स्थिती आहे, जिथे आपण शुद्ध भावनेने समर्पित होतो. म्हणूनच कुटुंबातील सदस्य आणि अंत्यसंस्काराला उपस्थित असणारे लोक पांढरे कपडे घालतात.
पाश्चिमात्य देशांत जिथे काळा रंग शोकाचं चिन्ह मानला जातो, तिथे हिंदू धर्मात मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. इथे मृत्यूला शेवट मानलं जात नाही, तर आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात मानली जाते. म्हणून आपण काळ्याऐवजी पांढऱ्या रंगातून एक प्रकारची स्वीकृती आणि सकारात्मकता व्यक्त करतो. यात कुठलीही घालमेल नाही, उलट मृत व्यक्तीला आपल्या भावनांनी शांती मिळो, यासाठीचा एक सुंदर भाव असतो.
शांती आणि सकारात्मकतेचे प्रतीक
असेही म्हटले जाते की पांढऱ्या रंगाची ऊर्जा नकारात्मकतेपासून संरक्षण करते. अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरणात एक प्रकारची भावनिक घालमेल, अस्वस्थता असते. त्यावेळी पांढरा रंग शांती आणि सकारात्मकतेचा एक वलय निर्माण करतो. तो फक्त शरीरावर नसतो, तर आपल्या मनावरही असतो. संयमाने, साधेपणाने आपण त्या वेळी जी भावना धरतो, तीच खरी श्रद्धांजली ठरते.