आजच्या जगात सगळं काही इतक्या वेगानं घडतंय की माणसाला स्वतःचं मन कुठे हरवलंय असं वाटतं. दिवसभराची धावपळ, अपेक्षांचं ओझं, अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या आणि सततच्या स्पर्धेचा ताण या सगळ्याचा विस्फोट अखेर कुठे तरी होतोच. अनेकदा हा विस्फोट शिवीगाळच्या स्वरूपात बाहेर पडतो. कुणी थेट बोलून मोकळं होतं, तर कुणी मनातल्या मनात उगाचच राग व्यक्त करतं. पण या सगळ्या प्रक्रियेनंतर एक गोष्ट हमखास होते. माणूस थोडासा शांत होतो, थोडेसे हलके वाटायला लागते. का बरं असं होतं? विज्ञान याचा नेमका खुलासा कसा करतो?

माणसाच्या जीवनात आज इतकी गडबड झाली आहे की शांत बसणं, खोल श्वास घेणं किंवा कुणाशी मनमोकळं बोलणं हे दुर्मिळ झालंय. कामाच्या गडबडीत आपण नकळत स्वतःला विसरतो, आणि जेव्हा मनावर ताणाचा भार वाढतो, तेव्हा कुठूनतरी तो बाहेर पडतो. अशावेळी, रागाच्या भरात येणारी शिवी ही अगदी सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असते. काही सेकंदापुरती का होईना, पण ती मनात साठलेल्या चिडचिडेला बाहेर काढते.
वैज्ञानिकांचे संशोधन
याविषयी वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, शिवीगाळ ही केवळ एक वाईट सवय नाही, तर ती एक प्रकारची नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते, तेव्हा तिच्या मेंदूतून ‘कॉर्टिसॉल’ नावाचं संप्रेरक तयार होतं. हे तणावविरोधी संप्रेरक माणसाला त्या क्षणी सावरायला मदत करतं. म्हणजेच, शिवीगाळ ही एक प्रकारे आपल्या तणावाच्या नियंत्रणासाठी शरीराने शोधलेली युक्ती आहे, असं म्हणायला हरकत नाही.
अमेरिकेतील न्यू जर्सीच्या कीन विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासातून हीच गोष्ट समोर आली आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना खूप थंड पाण्यात हात ठेवायला सांगितलं गेलं. काहींना फक्त शांत राहण्यास सांगितलं, तर काहींना शिवीगाळ करत हात आत ठेवण्याची मुभा दिली गेली. परिणाम असं दाखवतो की शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी थंड पाण्यात हात जास्त वेळ ठेवला. म्हणजेच, वेदना सहन करण्याची आणि तणावाला झेलण्याची त्यांची क्षमता अधिक होती.
…म्हणून शिवीगाळ केल्यानंतर मन होते शांत
याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ नेहमीच योग्य आहे. पण कधी कधी ती एक प्रकारे आपल्याला मानसिक सावरण्याची संधी देते. हे जणू एक ‘सेफ्टी वॉल्व्ह’ आहे, जे मनातल्या कोंडलेल्या भावना बाहेर काढतं. मग त्यासाठी शब्द कडवट असले तरी भावना खरी असते. शिवीगाळ ही काही सुसंस्कृत वागणुकीचा भाग नाही, पण ती आपल्या मनाच्या आरोग्याचं एक दुर्लक्षिलेलं अंग आहे. तिचं शास्त्र आहे, तिला कारणं आहेत. आणि कधीकधी, तीच आपल्याला तणावाच्या दलदलीतून बाहेर काढण्याचं साधन बनते.