आपण सर्वांनी भगवान शिवाची अनेक चित्रं पाहिलीयेत. त्यांच्या गळ्यात नाग, जटांमधून वाहणारी गंगा, हातात त्रिशूल आणि कपाळावर एक तेजस्वी अर्धचंद्र. हा चंद्र केवळ एक अलंकार नाही, तर त्यामागे एक गूढ आणि गहन अध्यात्मिक संदेश आहे. शिवाला ‘चंद्रशेखर’ का म्हटलं जातं, त्याच्या कपाळावर चंद्र नेमका कसा आणि का विराजमान झाला, यामागे एक पुरातन, पण खूप अर्थपूर्ण आख्यायिका आहे.

चंद्रशेखर शिव
समुद्रमंथनाच्या वेळी, जेव्हा साऱ्या सृष्टीचं भवितव्य संकटात आलं होतं, तेव्हा सर्व देव-दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं. त्यातून अमृतासोबतच भयंकर कालकूट विषही बाहेर आलं. हे विष इतकं घातक होतं की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या प्रभावाने नष्ट होण्याची शक्यता होती. तेव्हा भगवान शिवांनी कोणतीही भीती न बाळगता, स्वतः विष प्राशन केलं सृष्टीच्या रक्षणासाठी. पण हे विष त्यांच्या गळ्यापाशीच थांबावं यासाठी आणि त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी एका शीतल घटकाची गरज होती. तेव्हा चंद्राने शिवाच्या तपोबलाने भारावून जाऊन, स्वतःचं शीतल तेज शिवाच्या कपाळावर अर्पण केलं.
चंद्राला हिंदू धर्मात शांती, शीतलता आणि भावनिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. तो दिवसाच्या तेजात विरघळूनही आपलं सौम्य प्रकाशमान टिकवतो. हेच वैशिष्ट्य भगवान शिवांमध्ये दिसतं. एका बाजूला रुद्र, तांडव करणारे देव आणि दुसऱ्या बाजूला ध्यानस्थ, शांततेत रमणारे योगी. चंद्र धारण करणं म्हणजे स्वतःच्या क्रोधावर विजय मिळवणं, अंतःकरणात शांती टिकवणं आणि जगात संतुलन राखण्याचं प्रतीक. म्हणूनच कपाळावरचा चंद्र म्हणजे केवळ आभूषण नाही, तर एक गूढ आणि प्रेरणादायी संदेश आहे.
पौराणिक कथा
पौराणिक कथांमध्ये चंद्राचा एक वेगळा संदर्भही दिला जातो, सोमदेवाच्या रूपात. सोम म्हणजेच चंद्र, ज्याने एके काळी आपल्या गर्वामुळे शाप मिळवला होता. शापमुक्त होण्यासाठी त्याने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाले आणि त्याला आपल्या कपाळावर स्थान दिलं. म्हणूनच सोमवार हा दिवस शिवपूजेसाठी सर्वाधिक पवित्र मानला जातो.
शिवाच्या कपाळावरचा चंद्र आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा जीवनधडा देतो, की जीवनात कितीही विषाचे क्षण आले तरी मन शांत ठेवावं, संतुलन राखावं आणि क्रोधाऐवजी शांतीचा मार्ग स्वीकारावा. संकटं कितीही भयंकर असली, तरी संयमाने आणि आत्मविश्वासाने त्यांचा सामना करता येतो. चंद्रशेखर शिव आपल्याला शिकवतात की शक्ती आणि शांती यांचं सुंदर संमेलनच खरं ईश्वरी स्वरूप आहे.