प्रत्येक लँडिंगला हजारो टन दाब सहन करतात, तरीही विमानाचे टायर फुटत का नाहीत? जाणून घ्या कारण!

Published on -

विमानाचं लँडिंग बघणं म्हणजे एक थरारक अनुभव असतो. प्रचंड वजनाचं विमान आकाशातून झेपावत धावपट्टीवर अगदी अचूक आणि वेगाने उतरतं तेव्हा आपण अवाक होतो. पण या लँडिंगमध्ये एक गोष्ट कायम अचंबित करते, ती म्हणजे एवढं सगळं वजन, वेग आणि दाब झेलूनही हे टायर फुटत कसे नाहीत, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

जेव्हा एखादं विमान हवेतून उतरायला सुरुवात करतं, तेव्हा त्याचा वेग तब्बल 250 किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक असतो. लँडिंगच्या क्षणी विमानाचा संपूर्ण भार त्या टायरवर आदळतो, आणि काही सेकंदात त्यांच्यावर हजारो टन दाब निर्माण होतो. तरीही, हे टायर शांतपणे हे सगळं झेलतात आणि कुठेही आवाज न करता आपलं काम चोखपणे करतात. कारण त्यांची निर्मितीच अशी केली जाते की कोणताही धक्का, तापमानाचा बदल, किंवा घर्षण यांना ते सहज तोंड देऊ शकतात.

‘या’ पासून बनतात विमानाचे टायर

या टायरसाठी साधा रबर वापरला जात नाही. त्यासाठी वापरलं जातं अत्यंत टिकाऊ सिंथेटिक रबर, स्टीलचे मजबूत धागे, नायलॉनसारखी लवचिक पण ताकदवान सामग्री आणि विशेष तंत्रज्ञान. यामुळे हे टायर सामान्य वाहनांच्या टायरसारखे नसतात, तर लढाऊ सैनिकासारखे मजबूत आणि भरोसेमंद असतात. इतकंच नव्हे तर, त्यामध्ये भरली जाणारी हवा हीसुद्धा खास असते, ती म्हणजे नायट्रोजन. हा एक निष्क्रिय वायू असल्यामुळे तापमान वाढलं, दाब वाढला तरी स्फोटाचा किंवा आगीचा धोका राहत नाही. हीच गोष्ट टायरच्या टिकाऊपणामध्ये मोलाची भूमिका बजावते.

विमानाचे टायर किती वेळा वापरता येतात याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकच टायर सुमारे 500 वेळा वापरला जातो आणि त्यानंतरही तो थेट फेकून देत नाहीत. त्यावर नवीन ग्रिप बसवली जाते आणि अशी प्रक्रिया तब्बल 7 वेळा केली जाऊ शकते. म्हणजे एक टायर एकूण 3,500 वेळा वापरण्यासाठी सज्ज असतो. आणि हे सगळं इतक्या काळजीपूर्वक केलं जातं की एक चुकीही महागात पडू शकते.

टायर बदलण्याची प्रोसेस

टायर बदलणंही काही साधं काम नाही. दोन अनुभवी तंत्रज्ञ मिळून ते करतात, आणि त्यासाठी किमान एक तास लागतो. टायर बदलताना सर्व सुरक्षा उपाय कटाक्षाने पाळल्या जातात. विमान कंपनीकडून या प्रक्रियेची नियमित तपासणी होते आणि सर्व टायर्स विशेष चाचण्या पार करूनच वापरात आणले जातात.

लँडिंगच्या क्षणी जेव्हा टायर जमिनीला स्पर्श करतात, तेव्हा अनेकदा एक छोटासा धूर आपल्याला दिसतो. तो धूर म्हणजे टायर आणि धावपट्टी यामध्ये झालेल्या अचानक घर्षणाचा परिणाम असतो. पण ही गोष्ट पूर्णपणे सामान्य आहे आणि त्यामुळे भीती वाटण्याचं काहीच कारण नाही.

पावसाळा असो की धुकं, विमानं सहज उतरतात याचं श्रेय टायरच्या डिझाइनलाही द्यावं लागतं. टायर्सच्या पृष्ठभागाची डिझाईनच अशी असते की, त्या पाण्याला बाजूला ढकलतात आणि टायर्सला थेट धावपट्टीशी जोडून ठेवतात. त्यामुळे ओल्या हवामानातही विमानांचं लँडिंग अगदी सहज होतं.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!