श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. सण, उपवास, पूजाअर्चा आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण देशात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मात्र याच महिन्यात काही विशिष्ट पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. हे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर त्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यदृष्टिकोनातूनही ठोस कारणं आहेत.

भारतात श्रावण महिन्याची सुरुवात यंदा 11 जुलैपासून होणार आहे. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते, जे सूक्ष्मजीव आणि जंतूंच्या वाढीस पूरक ठरते. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि शरीर संसर्गजन्य आजारांसाठी अधिक संवेदनशील होतं. अशा काळात काय खावं आणि काय टाळावं, हे समजून घेणं आवश्यक आहे.
दही
दह्याचा थंड प्रकृतीवर परिणाम होतो. पावसाळ्यात वातावरण आधीच दमट आणि थंडसर असतं. अशावेळी दही खाल्ल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. शिवाय, या काळात गवतावर अनेक प्रकारचे जंतू जमा होतात, ज्यावर गायी किंवा म्हशी चरतात. त्यामुळे त्यांच्या दूधात सूक्ष्म जीवाणू असण्याची शक्यता वाढते. हेच दूध दह्याच्या रूपात पचनासाठी हानिकारक ठरू शकतं.
लसूण व कांदा
आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात शरीराची पचनशक्ती कमजोर होते. अशावेळी कांदा आणि लसूण यासारख्या तिखट, उष्ण गोष्टी पचायला जड पडतात. त्यामुळे पोट फुगणे, गॅसेस, अपचन आणि आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. उपवासाच्या आणि सात्त्विक अन्नाच्या संकल्पनेतही यांचे सेवन वर्ज्य मानले जाते.
वांगी
चरक संहितेनुसार वांग्याच्या सेवनाला श्रावण महिन्यात मनाई आहे. कारण वांगे हे जमिनीत उगम पावणारे असून, या काळात मातीतील जंतू त्यावर जमा होतात. त्यामुळे वांग्यामुळे अन्नातून संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.
हिरव्या पालेभाज्या
सुश्रुत संहितेमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहावं. पावसामुळे मातीतील अळी आणि इतर कीटक बाहेर येतात. हे कीटक पालेभाज्यांवर सहजपणे चिकटतात. त्यामुळे जरी भाज्या धुतल्या गेल्या तरी सूक्ष्म जंतू तसेच राहतात आणि ते पचनास त्रासदायक ठरतात.
त्यामुळे श्रावण महिन्यात धार्मिक कारणांसोबतच आरोग्यदृष्टिकोनातूनही काही अन्नपदार्थ टाळणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं पाचन सुरळीत राहील आणि संसर्गजन्य आजार टळले जातात.