महाभारत ही केवळ युद्धाची कथा नाही, ती माणसांच्या भावनांची, त्यांचे दुःख आणि त्यागाच्या अनेक पातळ्यांची एक खोल अनुभूती आहे. या महाकाव्यातील एक पात्र म्हणजे गांधारी, जिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये फक्त त्याग आणि दुःख अनुभवलं. तिची कथा इतकी वेदनादायक आहे की ती ‘महाभारतातील सर्वात दुर्दैवी स्त्री’ म्हणून ओळखली जाते.

गांधारीची कहाणी
गांधारी ही गांधार देशाची राजकन्या. ती बुद्धिमान होती, कणखर होती आणि योग्यतेनं एक परिपूर्ण राणी होऊ शकली असती. पण तिचं आयुष्य तसं घडलं नाही. तिचं लग्न हस्तिनापूरच्या राजपुत्र धृतराष्ट्राशी ठरवण्यात आलं, जो जन्मतः अंध होता. हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं. विवाहानंतर, केवळ पतीच्या अंधत्वाशी एकरूप होण्यासाठी आणि त्याचं दुःख स्वतःच्या जीवनात उतरवण्यासाठी तिनं डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली. या एका कृतीने ती भारतीय स्त्रीच्या त्यागाचं प्रतीक बनली, पण त्याच वेळी तिनं स्वतःच्या आयुष्याचा प्रकाशही कायमचा हरवला.
गांधारीला भगवान शिवाकडून शंभर पुत्रांची माता होण्याचं वरदान लाभलं होतं. हे वरदान ऐकून तिच्या आयुष्याला अर्थ लाभेल असं वाटलं असेल, पण प्रत्यक्षात तिच्या मुलांनी तिला कधीच समाधान दिलं नाही. दुर्योधन आणि बाकी कौरवांनी कधी तिचं ऐकलं नाही. त्यांनी तिच्या शहाणपणाकडे दुर्लक्ष केलं आणि सत्तेच्या, सूडाच्या आंधळ्या हव्यासात देशाला विनाशाच्या दिशेने नेलं. गांधारीने अनेकदा आपल्या मुलांना सावध केलं, पण कुणीही तिचा आवाज ऐकला नाही.
श्रीकृष्णालाच दिला शाप
धृतराष्ट्र, तिचा पती, राजाचा अधिकार असूनही कमजोर इच्छाशक्तीचा होता. त्याने कधीही पत्नीचे शब्द गांभीर्याने घेतले नाहीत, ना त्याच्या पुत्रांच्या चुकीच्या वागण्यावर रोख लावला. गांधारीला तिच्या वैवाहिक नात्यांमध्ये केवळ एकटेपणा भेटला. एक अशी स्त्री, जी अंधत्वात होती, पण तरीही सत्य ओळखत होती. तिच्या डोळ्यांवर पट्टी होती, पण ती जगाच्या दृष्टीपेक्षा अधिक स्पष्ट पाहत होती.
महाभारत युद्ध जेव्हा पेटलं, तेव्हा तिला आधीच हा विनाश दिसत होता. तरीही ती युद्ध थांबवू शकली नाही. शेवटी युद्धात तिचे सगळे पुत्र एका मागोमाग मृत्यू पावले. एक आई म्हणून, तिच्यासाठी या दुःखाला कुठलाही शब्द अपुरा होता. शेवटचा मुलगा दुर्योधन मृत्यू पावल्यावर ती पूर्णपणे कोसळली. वेदनेच्या भरात तिनं श्रीकृष्णालाच शाप दिला, ज्यांच्यामुळे तिला वाटलं की युद्ध टाळता आलं असतं. पण नंतर तिलाही तिच्या त्या कृतीबद्दल खंत वाटली.