गंगाजल हे हिंदू धर्मात केवळ एक पाणी नाही, तर श्रद्धा, शुद्धता आणि मोक्षाचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक मोठ्या पूजेमध्ये, अभिषेकामध्ये, किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गंगाजल वापरलं जातं. पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? गंगा नदी काशीमधूनही वाहते, तीथे स्नान करणेही पुण्यप्रद मानलं जातं… पण तरीही आपण गंगाजल हरिद्वारहूनच का आणतो? यामागं आहे एक गूढ, जे फक्त धार्मिकच नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं आहे.

गंगाजलाच्या महत्त्वाचं वर्णन प्राचीन शास्त्रांपासून ते आधुनिक विज्ञानातही सापडतं. गंगाजल कधीही खराब होत नाही, त्यामध्ये जंतू वाढत नाहीत, त्यामुळे ते कायम पवित्र आणि शुद्ध राहते. पण याच पवित्र गंगाजलाचं मूळ स्त्रोत कुठलं? देशभरात गंगा अनेक शहरांमधून वाहते, तरी पूजेसाठी हरिद्वार, गंगोत्री किंवा गौमुख येथून आणलेलं गंगाजलच शास्त्रात योग्य मानलं जातं. विशेषतः हरिद्वारचं गंगाजल हे सर्वाधिक पवित्र मानलं जातं.
काशीमधील गंगाजल अपवित्र का?
मग काशीमधील गंगाजल अपवित्र का मानलं जातं? याचे धार्मिक उत्तर थेट मोक्षाच्या तत्त्वाशी जोडलेलं आहे. काशी हे शहर मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होण्याचं ठिकाण मानलं जातं. जगद्गुरू शंकराचार्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की, जे गंगाजल काशीमध्ये वाहते, त्यामध्ये अनेक आत्म्यांना मोक्ष प्राप्त झालेला असतो. त्या पवित्र गंगाजलाला घरात आणणं म्हणजे त्या मोक्षदायी तत्त्वाला घरापासून दूर नेणं, जे एक प्रकारचं पाप समजलं जातं. इतकंच नव्हे, तर असेही म्हटले जाते की काशीच्या गंगाजलात स्नान करणे पुण्यप्रद आहे, पण ते घरी नेऊन पूजेत वापरणं निषिद्ध आहे.
या धार्मिक मान्यतेला विज्ञानदेखील दुजोरा देतं. कारण काशीमध्ये दररोज हजारो लोकांचे अंतिम संस्कार होतात. त्या मृतदेहांचे अवशेष, अस्थी व इतर पदार्थ गंगेत विसर्जित केले जातात. त्यामुळे काशीच्या गंगाजलामध्ये बरेच जैविक घटक असतात. यामुळे ते जल घरात वापरणं आणि आरोग्यासाठीही सुरक्षित मानलं जात नाही.
मग गंगाजल कुठून आणावे?
याउलट हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री ही ठिकाणं गंगेच्या अधिक उगमाजवळची आणि शुद्धतेच्या दृष्टिकोनातून आदर्श मानली जातात. म्हणूनच पूजेसाठी गंगाजल आणायचं असेल, तर हरिद्वारपासूनच ते आणणं शास्त्र आणि परंपरेनुसार योग्य ठरतं.