श्रावण महिना सुरू झाला, की गावोगावी भगव्या पोशाखात, खांद्यावर कावड घेऊन चालणारे शिवभक्त दिसू लागतात. त्यांची ही भक्ती, गंगाजलासाठीचा हा प्रवास आणि ते पवित्र जल भगवान शंकराच्या चरणी अर्पण करण्यामागचं कारण केवळ धार्मिक नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या पौराणिक कथांशी जोडलेलं आहे. विशेष म्हणजे या परंपरेच्या उगमाचं मूळ थेट लंकेच्या रावणाशी जुळतं जो शिवभक्तीचा एक अत्यंत उत्कट चेहरा होता.

रावणशी सबंधित कथा
रावणाची शिवभक्ती किती तीव्र होती, हे वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला माहिती आहे. तो नेहमी कैलास पर्वतावर जाऊन शिवाची पूजा करत असे. एकदा त्याच्या मनात एक विचार आला, की रोज रोज इतका लांब प्रवास का करायचा? कैलास पर्वतच जर लंकेत आणता आला, तर शिवपूजा किती सहज होईल! त्याने हेच ठरवलं, आणि कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पृथ्वी थरथर कापू लागली, तेव्हा भगवान शिव रुद्र रूप धारण करून प्रचंड क्रोधात आले आणि रावणाला आपल्या अंगठ्याने दाबून पर्वताखालीच अडकलं. वेदनेने विव्हळ झालेला रावण अखेर आपल्या चुकीची कबुली देतो, आणि शिवाची क्षमा मागतो.
शिवशंकर रावणाच्या पश्चात्तापाने प्रसन्न झाले. त्याने एक नवा मार्ग निवडला. आपल्या खांद्यावर गंगाजल घेऊन, कावडमध्ये भरून, त्याने पुन्हा कैलासाकडे प्रवास केला आणि शिवाचे जलाभिषेक केले. असे मानले जाते की, त्याच्या या भक्तीने शिव अत्यंत प्रसन्न झाले. आणि तिथूनच कावड यात्रेची सुरुवात झाली.
कावड यात्रेमागील पौराणिक कथा
या यात्रेच्या मागे आणखी एक कथा समुद्र मंथनाशीही जोडलेली आहे. जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं, तेव्हा सर्वात आधी निर्माण झालं ते हलाहल विष. ते इतकं घातक होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती. पण जग वाचवण्यासाठी शिवशंकरांनी ते विष पिऊन घेतलं. विष त्यांच्या गळ्यात अडकून राहिलं, आणि त्यांच्या शरीरात ताप पसरू लागला. हे सगळं घडलं श्रावण महिन्यातच. त्यांना शांत करण्यासाठी देवांनी गंगाजल अर्पण केलं. तेव्हापासून, हे पवित्र जल शिवाला अर्पण केल्याने ताप शमतो, असं मानलं जातं आणि त्याच्या स्मरणार्थ श्रावण महिन्यात गंगाजल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.
कावड यात्रा ही केवळ एका धार्मिक परंपरेचा भाग नाही, ती भक्ती, श्रद्धा आणि संयमाचा एक प्रतीक आहे. यात्रेत सहभागी भक्त कावड पाठीवर घेऊन, पायी चालत, अनेक कोसांचा प्रवास करतात. या वाटचालीत एक खास नियम पाळला जातो. गंगाजलाची कावड जमिनीवर ठेवायची नाही. एकमेकांच्या मदतीने ती पकडली जाते, पण कधीही खाली ठेवली जात नाही. यामागे पवित्रतेची भावना आहे.
आजही हजारो शिवभक्त बिहारच्या सुलतानगंजपासून ते उत्तराखंडच्या गंगोत्रीपर्यंत गंगाजल घेऊन निघतात. हे जल ते झारखंडमधील वैद्यनाथ धाम, काशी विश्वनाथ, तसेच अनेक महत्त्वाच्या शिव मंदिरांमध्ये अर्पण करतात. ही केवळ परंपरा नाही, ही एक अशी वाटचाल आहे, जिथे थकवा नाही, कारण ती चालणाऱ्याच्या मनात भक्तीचा झरा अखंड वाहत असतो.