जेव्हा आपण समुद्राच्या अथांग निळाईत एका ताठ पांढऱ्या गणवेशात उभ्या असलेल्या नौदल अधिकाऱ्याला पाहतो, तेव्हा त्या दृश्यामध्ये एक प्रकारची शिस्त, आदर आणि स्वाभिमान दडलेला असतो पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का, की भारतीय नौदलाचा गणवेश पांढराच का असतो? बाकीच्या सशस्त्र दलांमध्ये जिथे हिरव्या, निळसर किंवा गडद रंगांचा वापर होतो, तिथे नौदलात केवळ पांढरा रंग का निवडला गेला?

भारतीय सशस्त्र दल तीन प्रमुख भागांमध्ये विभागले गेले आहेत भारतीय सेना, हवाई दल आणि नौदल. प्रत्येक विभागाचा गणवेश त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार डिझाइन केला गेलेला असतो. भारतीय नौदलाचे कार्य समुद्राशी निगडित असल्यामुळे त्यांचा गणवेश देखील त्याच अनुरूप असतो – आणि म्हणूनच तो पांढऱ्या रंगाचा असतो. पण ही निवड केवळ सौंदर्य किंवा परंपरेपुरती मर्यादित नाही, यामागे अनेक अर्थपूर्ण कारणं आहेत.
भारतीय नौदलाचा गणवेश
पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो. नौदलाचं कार्य केवळ युद्धाच्या प्रसंगी लढणं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता राखणं, किनारी भागांमध्ये मदतकार्य करणं, आणि समुद्रातील धोके दूर करणं असतं. अशा शांततेच्या सेवेत असताना, पांढरा गणवेश त्या भूमिकेची ओळख बनतो. शिवाय, हा रंग शक्ती आणि वर्चस्वाचंही प्रतीक आहे. एक अशी ओळख जी जगाच्या कोणत्याही बंदरावर, कोणत्याही जलवाहतुकीच्या मार्गावर त्यांचं स्थान ठामपणे अधोरेखित करते.
तांत्रिक दृष्टीकोनातून पाहिलं, तर समुद्रावर काम करताना पांढरा रंग अतिशय उपयुक्त ठरतो. पांढऱ्या रंगाची खासियत म्हणजे तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. समुद्रावर दीर्घ वेळ उन्हात काम करताना, शरीर गरम होऊ नये म्हणून असा रंग उपयोगी पडतो. पांढऱ्या गणवेशामुळे अधिकाऱ्याचं शरीर तुलनेने थंड राहतं, जे त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतं.
शिस्त आणि स्वाभिमानाचे प्रतीक
तसंच, संकटाच्या प्रसंगी जसं की वादळात अडकलेल्यांना वाचवायचं असेल तेव्हा पांढरा रंग दूरवरूनही स्पष्ट दिसतो. समुद्राच्या निळसर पार्श्वभूमीवर पांढरा गणवेश चमकून दिसतो, ज्यामुळे शोध व बचाव मोहिमा अधिक यशस्वी होतात. हा फक्त गणवेश नसतो, तर जीव वाचवण्याचं एक साधनही ठरतं.
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पांढऱ्या कपड्यांवर घाण पटकन दिसते, त्यामुळे प्रत्येक सैनिक आपला गणवेश स्वच्छ आणि नीट ठेवण्याकडे अधिक जागरूक असतो. ही सवय त्यांच्यामध्ये शिस्त आणि स्वाभिमान अधिक दृढ करते जी कोणत्याही शूर सेवकाची खरी ओळख असते.