मानवी इतिहासात आर्थिक व्यवहारांची सुरुवात झाली तेव्हापासून लोकांनी वस्तूंची देवाणघेवाण विविध स्वरूपात केली. पण एका टप्प्यानंतर, व्यवहार अधिक सुलभ व्हावेत यासाठी विशिष्ट मूल्य असलेले चलन आवश्यक बनले. त्यातूनच नाण्यांचा जन्म झाला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्राचीन काळात ही नाणी नेमकी कोणत्या धातूंनी बनवली जात होती आणि त्यासाठी सोने चांदीच का निवडलं गेलं? आज जरी आपण स्टील, निकेलसारख्या धातूंमधून बनलेली नाणी पाहतो, तरी हजारो वर्षांपूर्वी हे चित्र खूप वेगळं होतं.

3,000 वर्षांपूर्वीचा इतिहास
सुमारे 3,000 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार, जगात नाणी वापरण्याची सुरुवात झाली. सोने आणि चांदी ही धातू केवळ मौल्यवान नव्हत्या, तर टिकाऊ आणि दीर्घकाळ सुरक्षित राहणाऱ्या होत्या. सोने आणि चांदीला एक खास चमक, शुद्धता आणि वजन यामध्ये सातत्य असल्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसला. त्यामुळेच ही नाणी केवळ देवाणघेवाणीचं साधन नसून प्रतिष्ठेचंही प्रतीक बनली होती.
आज आपल्याला वाटतं की लोखंडासारखी धातू स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर व्हायला हवा होता. पण खरेतर, लोखंड सहज गंजते आणि टिकाऊ राहत नाही, त्यामुळे त्यावर दीर्घकालीन व्यवहार अवलंबून ठेवणं कठीण होतं. सोने आणि चांदी मात्र हवामानाच्या प्रभावाला फारसे बळी पडत नाहीत. म्हणूनच त्या काळी कोणती धातू केवळ उपलब्ध आहे हे न पाहता, तिची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सार्वजनिक विश्वास हाही विचार केला जात असे.
‘इलेक्ट्रम’ मिश्रधातूची नाणी
इतिहासात असंही आढळून आलंय की सोने आणि चांदीच्या अगोदर ‘इलेक्ट्रम’ नावाच्या मिश्रधातूचा वापर नाण्यांसाठी केला जात होता. हे पिवळसर मिश्रण नैसर्गिकरित्या चांदी आणि तांब्याच्या मिश्रणातून तयार होत असे. पण त्यात शुद्धतेचा अभाव असल्यामुळे आणि प्रत्येक नाण्याची किंमत ठरवणं कठीण जमत असल्यामुळे हळूहळू याचा वापर कमी होऊ लागला.
प्लॅटिनम, पॅलेडियम, रेडियम यांसारख्या इतर मौल्यवान धातूंविषयी विचार केला, तर त्या खरोखरच खूप मूल्यवान आहेत. पण त्या प्राचीन काळात माणसाला ज्ञातच नव्हत्या. त्या शतकानुशतके नंतर कुठे शोधल्या गेल्या आणि म्हणूनच त्यांचा चलन बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागच नव्हता.