अणुबॉम्ब म्हटलं की आपल्याला आठवतं ते दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीचा विनाश. पण त्या विध्वंसाच्या कित्येक पट अधिक ताकद असलेला एक बॉम्ब सोव्हिएत युनियनने एकेकाळी तयार केला होता, ज्याचं नाव होतं ‘झार बॉम्बा’. तो केवळ अणुचाचणीचा भाग होता, पण त्याची ताकद आणि प्रभाव एवढा भयानक होता की आजही जगभरात तो “पृथ्वीच्या विनाशाचं शस्त्र” म्हणून ओळखला जातो.

‘झार बॉम्बा’चा इतिहास
साल होतं 1961. जगभरात शीतयुद्धाचा तणाव शिगेला पोहोचला होता. सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता एकमेकांना शक्ती दाखवण्याच्या शर्यतीत होत्या. अशा वेळी सोव्हिएत युनियनने एका प्रयोगाची तयारी सुरू केली. एक असा अणुबॉम्ब, जो यापूर्वी कोणीच पाहिलेला नव्हता. झार बॉम्बा, म्हणजेच “बॉबांचा राजा”, याचं अधिकृत नाव होतं AN602. पण त्याच्या ताकदीमुळे तो केवळ एक शस्त्र न राहता, एका भीतीदायक शक्तीचं प्रतीक बनला.
झार बॉम्बाचं वजन तब्बल 27 टन होतं, म्हणजे जवळपास एका मोठ्या ट्रकएवढं. इतका मोठा बॉम्ब उडवण्यासाठी नेहमीचं विमान पुरेसे नव्हते, म्हणून विशेष प्रकारे सुधारित केलेल्या Tu-95V बॉम्बर विमानाचा वापर करण्यात आला. 30 ऑक्टोबर 1961 रोजी, आर्क्टिक वर्तुळातील नोवाया झेमल्या बेटाजवळ झार बॉम्बा 10,500 मीटर उंचीवरून खाली सोडण्यात आला. जमिनीवर आदळण्यापूर्वीच, 13,000 फूट उंचीवर त्याचा स्फोट झाला. आणि मग जे काही घडलं, ते मानवी इतिहासात एक भयावह नोंद बनली.
वजन आणि वैशिष्ट्ये
स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याच्या धुक्याची मशाल 64 किलोमीटरपर्यंत वर गेली. 100 किलोमीटर लांब असलेल्या लोकांनी देखील स्फोटाची उजळ सूर्यप्रकाशासारखी झलक पाहिली. स्फोटाच्या 50 किलोमीटरच्या परिघात असलेली प्रत्येक गोष्ट एका झटक्यात नष्ट झाली असती. त्याची ऊर्जा इतकी होती की हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’ नावाच्या अणुबॉम्बपेक्षा झार बॉम्बा तब्बल 3,333 पट अधिक शक्तिशाली होता. हिरोशिमाचा बॉम्ब 15 किलोटन होता, तर झार बॉम्बा 50 मेगाटन म्हणजे कित्येक कोटी किलोटन.
या बॉम्बची निर्मिती आणि चाचणी यामागचा उद्देश प्रत्यक्ष युद्ध नसून राजकीय आणि सामरिक दबाव होता. सोव्हिएत युनियनला अमेरिकेला आणि जगाला दाखवायचं होतं की त्यांच्या वैज्ञानिक आणि लष्करी शक्तीची मर्यादा कुठपर्यंत पोहोचू शकते. हा बॉम्ब प्रत्यक्ष युद्धात वापरणं अशक्यच होतं. कारण तो उडवायला आणि टाकायला लागणारी तयारी इतकी क्लिष्ट आणि वेळखाऊ होती की शत्रूपर्यंत पोहोचण्याआधीच विमान परत येणार नव्हतं. पण त्याची उपस्थिती हीच भीती निर्माण करणारी होती.
झार बॉम्बाची विनाशकारी क्षमता
आज जर अशा प्रकारचा बॉम्ब एखाद्या मोठ्या शहरावर टाकला गेला, तर एका झटक्यात किमान 6 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो, असा अंदाज आहे. फक्त स्फोटच नाही, तर त्यानंतर येणारा किरणोत्सर्ग (Radiation) अनेक पिढ्यांवर परिणाम करू शकतो. जमिनीची स्थिती बदलून जाईल, हवामानावर परिणाम होईल, आणि त्या परिसरात आयुष्य पुन्हा कधीही पूर्ववत होणार नाही.
झार बॉम्बा हा केवळ एक अणुबाँब नव्हता. तो मानवी हव्यास, स्पर्धा आणि विज्ञानाच्या अमर्याद क्षमतेचं प्रतीक होता. एवढ्या ताकदीचा स्फोट एकदा अनुभवल्यावर, जगाने अणुशस्त्रांच्या धोक्याबाबत अधिक गंभीर विचार केला. विशेष म्हणजे, या चाचणीचे फोटो आणि फुटेज जवळपास 60 वर्षं जगापासून लपवून ठेवण्यात आले.