आपल्या भोवतालच्या तंत्रज्ञानाच्या या धावत्या युगात, जेव्हा सगळं काही स्मार्ट झालंय, तेव्हा काही लोक या ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा फारच भयानक वापर करत आहेत. हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूमसारख्या खासगी जागांमध्ये छुपे कॅमेरे लावून कुणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे वाचून अंगावर काटा येतो, पण हे सत्य आहे. अशा धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करता येईल, हे समजून घेणं आपल्यासाठी अत्यावश्यक आहे.

अनेकांनी अनुभवलेलं असेल की, आपण हॉटेलमध्ये चेक इन करताना खोलीच्या आरशाकडे नजर टाकतो, पण फारसं काही लक्ष देत नाही. मात्र, सध्याच्या काळात हीच बेपर्वाई तुमच्या गोपनीयतेसाठी घातक ठरू शकते. कारण काहीवेळा कॅमेरे दोन बाजूंनी पारदर्शक आरशामध्ये लपवलेले असतात. आता हे कॅमेरे शोधायचे कसे, याबाबत आपण काही ट्रिक जाणून घेणार आहोत.
आरशाची चाचणी
यासाठी अगदी साधी चाचणी म्हणजे, जर आरशाच्या पाठीमागे कॅमेरा लपवलेला असेल, तर तो अनेक वेळा दोन-मार्गी असतो. आरशावर बोट ठेवून पाहा, जर तुमचं बोट आणि त्याचं प्रतिबिंब एकमेकांना थेट स्पर्श करत असेल, तर ती शक्यता वाढते. साधारण आरशात थोडं अंतर दिसतं.
यासोबतच खोलीतले दिवे, स्मोक डिटेक्टर, घड्याळं, चार्जिंग पॉइंट्स अशा अनेक जागा आहेत जिथे अत्यंत कुशलतेने लपवलेले कॅमेरे बसवले जातात.
Wi-Fi नेटवर्क
आजकाल बहुतांश कॅमेरे वाय-फायवर चालतात. त्यामुळे एखादं अनोळखी नेटवर्क फोनवर अचानक दिसलं, त्याचं नाव थोडं विचित्र वाटलं, तर सतर्क व्हा. कारण तो तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्याशी जोडलेला असू शकतो. मोबाइल फोनचाच उपयोग करून हा धोका ओळखता येतो. तुमच्या मोबाईलने ‘Available Networks’ तपासा. अनोळखी, विचित्र नावाचे किंवा कॅमेरा, IP, DVR सारख्या नावांचे नेटवर्क दिसले, तर लगेच सावध व्हा.
Radio Frequency
थोडं पुढं जाऊन काही जण Radio Frequency डिटेक्टरसारखं उपकरण वापरतात. हे डिव्हाईस लपवलेल्या कॅमेऱ्याचे सिग्नल्स शोधून काढतं. हॉटेलमध्ये किंवा रूममध्ये प्रवेश करताना आपण अशा प्रकारचं उपकरण बरोबर नेलं, तर गोपनीयतेचं संरक्षण अधिक खात्रीशीरपणे करता येतं.
पण या सगळ्यात आपण स्वतः देखील जागरूक असणं गरजेचं आहे. डिजिटल युगाने आपल्याला खूप काही दिलं, पण त्याचबरोबर काही लोकांनी त्याचा अनिष्ट हेतूसाठी वापर करायला सुरुवात केली. आपण हॉटेलमध्ये, बदलत्या खोलीत किंवा कुठल्याही खासगी जागेत असलो, तरीही प्रत्येक वस्तूकडे थोडं काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. कारण एक दुर्लक्ष तुमचं आयुष्य उध्वस्त करू शकतं.