आपण रोजच्या जेवणात लिंबाचा रस वापरतो, त्याची चव घेतो आणि लगेच त्याची साल कचराकुंडीत फेकून देतो. पण तुम्हाला कल्पनाही नसेल की ही साल देखील एक खजिना आहे तो ही पोषणाचा, चविचा आणि सुगंधाचा. अनेक लोक लिंबाची साल केवळ तांबे किंवा पितळ घासण्यासाठी वापरतात, तर काहीजण ती फेसपॅकमध्ये मिसळतात. पण जेव्हा तुम्हाला या सालीचे खाण्याचे उपयोग समजतील, तेव्हा तुम्हीही हेच म्हणाल “हे आधी का कुणी सांगितलं नाही!”

लिंबाच्या सालीमध्ये केवळ चव नाही, तर आरोग्यासाठी खूप आवश्यक असलेली पोषणद्रव्यंही असतात. एका छोट्याशा सालीत भरपूर फायबर असतं आणि केवळ 6 ग्रॅममध्ये दररोजच्या व्हिटॅमिन C च्या गरजेपैकी 9% भाग पूर्ण होतो. याशिवाय त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे घटकही थोड्याफार प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
जाम
या साली तुम्ही खाण्यासाठी कशा वापरू शकता, हे कळलं की तुम्हाला त्या कधीच वाया घालव्याश्या वाटणार नाहीत. जर घरी भरपूर लिंबं वापरली गेली असतील, तर त्यांची साले धुऊन, आतला थोडासा पांढरा भाग काढून घ्या, लहान तुकडे करा आणि साखर घालून गॅसवर शिजवा. काही वेळात एक चवदार, आंबटगोड जाम तयार होईल जो मुलांना ब्रेडवर, पराठ्यावर लावून द्याल तर ते चाटून खातील.
लेमन जेस्ट
याशिवाय, लिंबाच्या ताज्या साली किसून तुम्ही पेयांमध्ये, केक्समध्ये किंवा मफिन्समध्ये घालू शकता. ही साल केवळ चव देत नाही, तर त्या पदार्थात एक ताजेपणा आणि नैसर्गिक सुगंधही भरते.
पावडर
जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल, तर लिंबाच्या साली उन्हात वाळवा आणि त्याची बारीक पावडर करून घ्या. ही पावडर काळ्या चहा किंवा ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्यास चहाची चव खुलते आणि शरीरालाही एक नैसर्गिक डिटॉक्स मिळतो.
आणखी एक खास वापर म्हणजे घरगुती मसाला. वाळवलेली साल, थोडं लिंबू पावडर आणि थोडीशी पांढरी मिरी मिसळून एक खास मसाला तयार करा. हा मसाला तुम्ही चाटवर, टिक्कीत, रायता किंवा अगदी नाचोसवरही शिंपडू शकता. यामुळे तुमचा स्नॅक्स अधिक चविष्ट बनेल.