सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी न पिणारे असे खूपच कमी लोक असतील. मात्र जर सकाळी चहा मिळाला नाही तर अनेकांचा दिवसच चांगला जात नाही.
अनेकांना नाश्ता करण्यात फारसा नसतो पण चहा बिस्किट्स किंवा नुसता चहा मिळाला तरी त्यांच्या दिवसाची सुरूवात छान होते. म्हणजेच एखादेच असे घर असेल की, ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहापासुन होत नाही. मात्र आता हा चहादेखील तुमच्या घराचे बजेट वाढवू शकतो. ते कसे ? वाचा सविस्तर …
आपल्याकडे आसाम व पश्चिम बंगाल या दोन राज्यात मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या दिवसा जास्त पाऊस असल्यामुळे चहाच्या पिकाला म्हणावा तसा सूर्य प्रकाश मिळत नसल्याने चहा पानांची पुरेशी वाढ झाली नाही.
या विपरित हवामानामुळे या दोन्ही राज्यांत असलेल्या चहाच्या पिकावर देखील विपरित परिणाम झाला असून, त्यामुळे उत्पादनामध्ये कमालीची घत आली आहे.
त्यातच एप्रिल महिन्यामध्ये झालेली गारपीट व अतिवृष्टी यामुळेही चहाच्या पिकावर खूप विपरीत परिणाम झाले आहेत. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पश्चिम बंगालचे उत्पादन ४० टक्के कमी झाले आहे.
तर आसामचे उत्पादन देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी झाले आहे.त्यामुळे आगामी काळात चहाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अतिउष्णता आणि नंतर पावसामुळे चहा उत्पादनात घट आल्याचे परिणाम चहाच्या घाऊक दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात चहाची सरासरी किंमत २१७.५३ रुपये प्रति किलो होती, मात्र एका वर्षापूर्वी हीच किंमत १८१.२२ रुपये प्रति किलो होती. या दरवाढीमुळे चहाची निर्यात कमी होण्याची शक्यता नाही, कारण कीटकनाशकांच्या बंदीनंतर अनेक खरेदीदार त्यांच्या ऑर्डर वाढवत आहेत.
या वर्षीच्या पहिल्या ४ महिन्यांत चहाची निर्यात एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी वाढून ९.२ कोटी किलो झाली.
देशातील सीटीसी ग्रेड चहा इजिप्त, ब्रिटनला जातो, तर पारंपारिक प्रकार इराक, इराण आणि रशियामध्ये निर्यात केला जातो. त्यामुळे चहाची निर्यात आहे तेवढीच राहणार असून घाऊक दरात वाढ होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही .