Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरु आहे. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची मोट बांधण्यात व्यस्त आहेत. अहमदनगर मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. नगरच्या राजकारणाचा विषय निघाला की शरद पवार आणि विखे पाटील यांच्या विरोधाची चर्चाही होते.
दरम्यान शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगर जिल्हा बँकेवरून टीका केली आहे. खरेतर जी एस महानगर बँक व नगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष कैलासवासी उदय शेळके यांच्या नावाने एक फाउंडेशन सुरू केले जात आहे.
उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन सुरू केले जाणार असून यासाठीचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवारसहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खासदार नीलेश लंके, जिल्हा बँक व महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, ‘पद्मश्री’ पोपटराव पवार, माजी आमदार सुधीर तांबे, अरुण कडू-पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी कै. उदय शेळके यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच, नगर जिल्हा सहकारी बँक राज्यातील दिग्गज बँकांपैकी एक आहे. मात्र, आता या बँकेविषयी मला काळजी वाटतेय.
आज तिथे कसे आणि कोणते लोक बसलेत, त्यावर भाष्य न केलेलं बरं ! तिथे काय शिजयंत ते सगळ्यांना माहीत आहे, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. सध्या नगर जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे.
म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे. पुढे बोलताना पवार यांनी बँकेचे काही प्रश्न असतील तर हक्काने सांगा त्यावर मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासनही दिले.