Citizenship Amendment Act : केंद्रातील मोदी सरकार नेहमीच अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. केंद्रातील सरकार केव्हा कोणता निर्णय घेणार हे काय सांगता येत नाही. याची प्रचिती आज देखील समोर आली आहे. अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघा काही काळ बाकी असतानाच केंद्रातील मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.
भारतात आजपासून सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अर्थातच भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा ज्याला CAA म्हणून ओळखले जात आहे तो लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने हा निर्णय आगामी निवडणुका लक्षात घेऊनच घेतलेला असल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.
खरे तर हा कायदा 2019 मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी संसदेत मंजूर करण्यात आला होता. कायदेमंडळात हा कायदा मंजूर होऊन आता पाच वर्षे उलटले तरी देखील याची अंमलबजावणी झालेली नव्हती. परंतु आगामी निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने आज एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
आजपासून हा कायदा लागू करण्यात आला आहे. याचे नोटिफिकेशन अर्थातच अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण हा कायदा सर्वसामान्य भारतीयांवर कोणता परिणाम करणार, या कायद्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे CAA ?
अनेकांच्या माध्यमातून सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नेमके काय ? हा कायदा नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या कायद्याअंतर्गत प्रदीर्घ काळापासून भारतात राहणाऱ्या आपल्या शेजारील मुस्लिम राष्ट्रांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व बहाल केले जाणार आहे.
या अंतर्गत भारताशेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. अर्थातच हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे. या कायद्यामुळे कोणत्याच भारतीय नागरिकाचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा इतर पंथ, समूदायातील असो.
CAA कायदा कोणासाठी आहे ?
हा कायदा आपल्या शेजारील 3 मुस्लिम देशांतील सहा अल्पसंख्याक समुदायासाठी आहे. CAA अंतर्गत 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्यांना नागरिकत्व मिळणार आहे. हा कायदा या 3 देशातून स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या 6 समुदयासाठी लागू आहे.
या कायद्याअंतर्गत भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातील अल्पसंख्यांक (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) हे धार्मिक छळामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकणार आहेत. या सदर लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा सारख्या प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे. या लोकांसाठी भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे.
CAA चा तुमच्यावर काय परिणाम होणार ?
CAA चा भारतीय नागरिकांवर कोणताच परिणाम होणार नाही. कोणताही भारतीय नागरिक मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्यांच्यावर या कायद्याचा कोणताच परिणाम होणार नाही.
हा कायदा कोणत्याच भारतीय नागरिकांचे नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी याआधीच ही माहिती दिलेली आहे. अर्थातच CAA मुस्लिम नागरिकांसह कोणत्याही भारतीय नागरिकांवर परिणाम करणार नाही.