EV battery Life : तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचे आयुष्य किती असते ?

Tejas B Shelar
Published:

सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढत आहे, कारण त्या इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहेत. मात्र, इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचे आयुष्य किती असते आणि त्याचे दीर्घायुष्य टिकवण्यासाठी कोणते उपाय करावेत, हा अनेक ग्राहकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. इलेक्ट्रिक कारची बॅटरी ही सर्वात महाग आणि महत्त्वाचा घटक असते, म्हणूनच तिची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. EV बॅटरी व्यवस्थित वापरल्यास, ती 8 ते 10 वर्षांपर्यंत उत्तम परफॉर्म करू शकते. योग्य चार्जिंग सवयी, तापमान नियंत्रण, आणि योग्य ड्रायव्हिंग पद्धती वापरल्यास बॅटरीचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो आणि त्याचे देखभाल खर्चही कमी होतो.

इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचे आयुष्य साधारण 7-8 वर्षे असते, पण योग्य काळजी घेतल्यास ते 10 वर्षांपर्यंत टिकू शकते. बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होण्यापासून रोखणे, वारंवार फास्ट चार्जिंग टाळणे, गाडी थंड किंवा सावलीत पार्क करणे, आणि इको मोडमध्ये कार चालवणे हे काही महत्त्वाचे उपाय आहेत, जे बॅटरीच्या आयुष्याचा कालावधी वाढवू शकतात. EV खरेदी करताना बॅटरीच्या गुणवत्तेकडे आणि वॉरंटीकडे लक्ष द्या, कारण ती कारच्या एकूण किंमतीचा मोठा भाग असते. योग्य काळजी घेतल्यास बॅटरी जास्त काळ टिकेल आणि तुमच्या इलेक्ट्रिक कारचा प्रवास अधिक किफायतशीर आणि दीर्घकालीन लाभदायक ठरेल.

बॅटरीचे आयुष्य किती असते?

सर्वसाधारणपणे, चांगल्या दर्जाची EV बॅटरी 2000 चार्ज सायकलपर्यंत टिकते, म्हणजेच साधारणपणे 7-8 वर्षे ती कार्यक्षमतेने काम करते. जर तुम्ही दररोज 200 ते 500 किमी प्रवास करत असाल, तर बॅटरी सहज 7 वर्षांहून अधिक काळ चांगली परफॉर्म करू शकते.

तथापि, वेळोवेळी बॅटरीच्या क्षमतेत 5 ते 10% घट होते, ज्यामुळे पूर्ण चार्ज केल्यानंतर मिळणाऱ्या किलोमीटरच्या श्रेणीत कमी होऊ लागते. तसेच, बॅटरीचे आयुष्य हे तिच्या गुणवत्तेवर, वापराच्या सवयींवर आणि चार्जिंग पद्धतीवर अवलंबून असते. योग्य काळजी घेतल्यास बॅटरीचे आयुष्य वाढवता येते आणि तिची कार्यक्षमता जास्त काळ टिकते.

बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी…

1. बॅटरी 20% ते 80% चार्जिंग

बॅटरीचे आयुष्य जास्त काळ टिकवण्यासाठी तिला पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका आणि 100% चार्जिंग टाळा. EV बॅटरी 20% ते 80% च्या दरम्यान चार्ज ठेवणे सर्वांत फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही 10% किंवा त्याखाली बॅटरी डिस्चार्ज केली आणि 100% चार्ज केली, तर तिच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो.

2. फास्ट चार्जिंगचा कमी वापर

फास्ट चार्जिंग सोयीस्कर असते, पण त्याचा बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो. फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी गरम होते आणि तिचे सेल्स लवकर खराब होऊ शकतात. शक्य असल्यास, सोप्या आणि कमी व्होल्टेजच्या चार्जरने कार चार्ज करणे चांगले. गाडीसोबत मिळणाऱ्या OEM चार्जरचा वापर करणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहे.

3. थंडीपासून बॅटरीचे संरक्षण

इलेक्ट्रिक कारची बॅटरी जास्त गरम झाली किंवा खूप थंड झाली, तर ती जलदगतीने खराब होते. कार थेट सूर्यप्रकाशाखाली पार्क केल्यास बॅटरी गरम होते आणि त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, अत्यंत थंड हवामानात बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे शक्य असल्यास, कार गॅरेजमध्ये किंवा सावलीत पार्क करा.

4. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम अपडेट

इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) असते, जी बॅटरीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. वेळोवेळी सिस्टम अपडेट करणे आवश्यक आहे, कारण हे बॅटरीच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास आणि कारच्या ड्रायव्हिंग रेंजला स्थिर ठेवण्यास मदत करते.

5. गाडी स्थिर आणि संथ गतीने चालवा

इलेक्ट्रिक कार चालवताना अचानक वेग वाढवणे किंवा जोरात ब्रेक लावणे टाळा. असे केल्याने बॅटरीवर अनावश्यक ताण येतो आणि ती लवकर खराब होते. इको मोडमध्ये कार चालवल्यास बॅटरीचा अधिक चांगला उपयोग होतो आणि तिचे आयुष्य वाढते. वेगवान प्रवेग आणि सतत ब्रेकिंग केल्याने बॅटरी जास्त उर्जा वापरते आणि लवकर डिस्चार्ज होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe