Explained : अहिल्यानगरच्या साखर सम्राटांना महायुतीचा सुरुंग ! स्थानिक निवडणुकीतही हादरे?

नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांची सत्ता ढासळतेय का? ज्यांनी तीन पिढ्यांपासून राजकारण गाजवलं, त्यांनाच आता मतदार नाकारतोय का? महायुतीने या साम्राज्याला सुरुंग लावला का? हे समजून घ्या आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये…

Published on -

नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकाराच्या राजकारणाभोवतीच या जिल्ह्याचे राजकारण चालते. या जिल्ह्यातील अनेक घराण्यांच्या दोन-तीन पिढ्या, याच शुगर लाँबीच्या जोरावर खुर्च्या टिकवून आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत, याच शुगर लाँबीला हिंदूत्वाच्या राजकारणाने व लाडक्या बहि‍णींच्या लाटेने पराभवाची चव चाखायला लावली.

आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही या शुगर लाँबीला झटका बसेल का? अशा शंका येऊ लागल्या आहेत. कारण महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत टाकलेले जाळे अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. शुगर लाँबीला धोक्याचा इशारा काय आहे? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट

नगर जिल्ह्यात अगस्ती, थोरात, काळे, कोल्हे, प्रसाद, प्रवरा, मुळा, ज्ञानेश्वर, अंबालिका, बारामती, नागवडे, कुकडी, पाचपुते, केदारेश्वर, वृद्धेश्वर, स्वामी समर्थ, गणेश, गजानन, अशोक, गौरी शुगर, क्रांती शुगर, गंगामाई असे 13 सहकारी आणि 9 खासगी असे एकूण 22 कारखाने आहेत.

नगर जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर उसावर हे कारखाने चालतात. याच कारखान्याच्या जोरावर चालणारा नगर जिल्ह्यातील सहकार, राज्यात आदर्श मानला जातो. नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांचे राजकारण साखर कारखान्यावर जिवावर चालल्याची उदाहरणे आहेत. शुगर लाँबीचा प्रत्येक नेता येथे दोन-तीन पिढ्यांपासून नेतृत्व करत आला आहे.

सहकारी साखर कारखाने, त्यातून सुरु झालेल्या शिक्षण संस्था, दवाखाने, इथेनाँल प्रकल्प, डिस्टिलरी, बायोगॅस प्रकल्प, दारु निर्मिती कारखाने, अशा सगळ्या सहकाराच्या जाळ्याभोवतीच नगर जिल्ह्याचे राजकारण चालते. सुमारे 10 ते 30 हजार कर्मचारी, आपल्या शुगर लाँबीच्या नेत्यांच्या प्रचारात दिसतात. त्यामुळे आमदारकीसह, सोसायट्या, पाणी वापर संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्यांवरच याच शुगर लाँबीच्या नेत्याचे निर्विवाद वर्चस्व असते. परंतु गेल्यावेळी हे सगळे राजकारण महायुतीच्या हिंदूत्वावर व लाडक्या बहि‍णींच्या मतदानावर बिघडले.

कुकडीचे राहुल जगताप, नागवडेच्या अनुराधा नागवडे, केदारेश्वरचे प्रताप ढाकणे, ज्ञानेश्वरचे चंद्रशेखर घुले, मुळाचे शंकरराव गडाख, प्रसादचे प्राजक्त तनपुरे, थोरातचे बाळासाहेब थोरात, अगस्तीचे पूर्वीचे वैभव पिचड यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. यापैकी अनेक मतदारसंघात शुगर लाँबीच्याच नेत्याच्या विजय झाला.

त्यात प्रवराचे राधाकृष्ण विखे, काळेचे आशुतोष काळे, वृद्धेश्वरच्या मोनिका राजळे, पाचपुतेचे विक्रम पाचपुते आदी शुगर लाँबीतील नेते निवडणूक आले. त्यात एक विशेष असे होते की, जे निवडून आले ते सर्व महायुतीचे होते. जे पडले ते महाविकास आघाडीचे होते.

म्हणजेच, एका अर्थाने महायुतीने नगर जिल्ह्यातील शुगर लाँबीला पद्धतशीर सुरुंग लावलेला दिसला. आता येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांतही महायुती शुगर लाँबीच्या नेत्यांच्या मक्तेदारी मोडून काढेल, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक लावतात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असतात.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने शुगर लाँबी खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे विधानसभेतील पराभवाचा बदला ही लाँबी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घेईल, असे त्यांचेच कार्यकर्ते सोशल मीडियावर छाती फाडून सांगू लागले आहेत.एकंदर ही सगळी परिस्थीती पाहिली तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगलीच रंगत पहायला मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe