Explained Shevgaon Politics : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार भाजपच्या मोनिका राजळे असल्या तरी, शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या घुले परिवाराचेच वर्चस्व आहे. शेवगाव पंचायत समिती व शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतही यापूर्वी घुले परिवाराचेच वजन राहिले आहे.
गेल्यावेळी म्हणजेच 2020 ला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने म्हणजेच घुले गटाने, 4 पैकी 3 गटांत, व आठपैकी 8 पंचायत समिती गणात विजय मिळवला होता. यावेळीही शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घुले- राजळे व काकडे यांच्यातच रंगणार आहेत.

घुले कुटुंब हे सध्या अजित पवार गटासोबत असल्याचे सांगितले जाते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकी त्यांनी अपक्ष लढत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे महायुतीत असले, तरी घुले विरुद्ध राजळे ही टशन चांगलीच रंगणार आहे. काय होईल शेवगाव पंचायत समितीत? आ. राजळेंना शेवगाव पंचायत समिती मिळवता येईल का? काकडेंचा जनशक्ती विचार मंच कुणासाठी धोकादायक ठरेल? याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, घुले कुटुंबाने गेल्या आठवड्यात शेवगाव बाजार समितीत खांदेपालट केली. शेवगाव बाजार समिती ही माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांच्याच ताब्यात आहे. तेथे सभापती म्हणून एकनाथ कसाळ व उपसभापति म्हणून गणेश खंबरे यांची निवड झाली होती.
परंतु आता तातडीने त्यांना राजीनामा द्यायला लावून शेवगावच्या पूर्व भागातील, नानासाहेब मडके यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. उपसभापतीपदी शेवगाव पश्चिमेच्या रागिणी लांडे यांना संधी मिळाली. बाजार समितीतील ही खांदेपालट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच करण्यात आल्याचे सांगितले जातेय.
शेवगाव तालुक्याच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत. आता जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत. या गट व गणाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. आता हे आरक्षण कसे आहे, ते आपण पाहू…
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण असे…
1. दहिगाव ने (इतर मागास वर्ग)
2. बोधेगाव (इतर मागास वर्ग)
3. मुंगी (इतर मागास वर्ग महिला)
4. भातकुडगाव (इतर मागास वर्ग महिला)
5. अमरापूर (अनुसूचित जाती)
पंचायत समितीचे गणाचे आरक्षण असे…
1. दहिगाव गण- सर्वसाधारण महिला
2. एरंजगाव गण- सर्वसाधारण महिला
3. चापडगाव गण- सर्वसाधारण
4. मुंगी गण- सर्वसाधारण
5. बोधेगाव गण- सर्वसाधारण महिला
6. लाडजळगाव गण- सर्वसाधारण महिला
7. भातकुडगाव गण- सर्वसाधारण
8. वाघोली गण- अनुसूचित जाती
9. अमरापूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
10. आखेगाव गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढल्याने चांगलीच तोडफोड झाली. जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर, दहिगावने, भातकुडगाव, बोधेगाव गट कायम राहिले. परंतु त्यांच्या गणात मात्र बदल झाला. या पुनर्रचनेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, बोधेगाव गटाच्या सदस्या संगीता दुसुंगे, भातकुडगाव गटाचे सदस्य रामभाऊ साळवे यांचे गट कामय राहिले. सगळ्यात मोठी पंचायत झाली ती हर्षदा काकडे यांची. हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गट वगळून तो गण करण्यात आला. त्यामुळे त्यांना इतर गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षीतीज घुले यांचा दहिगाव ने गण कायम राहिला. इतर अनेक गणांत मात्र आता पाच महिलांना संधी मिळणार आहे.
दुसरीकडे गेल्यावेळी आ. मोनिका राजळे यांच्या भाजपला या तालुक्यात खातेही उघडता आले नव्हते. यावेळी त्यांनी विधानसभेची हॅट्र्रीक केली असून, त्या शेवगाव पंचायत समिती जिंकण्याकडे लक्ष देणार असल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने शेवगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेवगाव पंचायत समिती ताब्यात घेण्याची व्यूव्हरचना भाजपचे कार्यकर्ते बांधताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच काट्याची होईल, असे दिसते.