Explained Newasa Elections : दरवर्षी आमदार बदलणारा मतदारसंघ म्हणून, नेवासा ओळखला जातो. नेवासा तालुक्याच्या इतिहासाचा विचार केला तर, येथे माजीमंत्री शंकरराव गडाख कुटुंबानेच राज्य केले. परंतु दरवर्षी आमदार बदलण्याची खेळी, तालुक्यातील जनता करत असल्याने या मतदारसंघावर आत्तापर्यंत कुणालाच दावा करता आला नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने तिरंगी लढत होऊनही, दोन आजी-माजी आमदारांचा पराभव केला. माजीमंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करत, शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे आमदार झाले.

आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या तालुक्यातील सगळ्याच मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे विद्यमान सभापती सुनील गडाख यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारसंघच उरला नाही. त्यातच जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने पुर्वीपेक्षा जास्त चुरस वाढली आहे. नेमकं काय चाललंय नेवासा मतदारसंघात? आजी-माजी आमदार काय करणार? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
नेवाशातील गेल्या वेळची निवडणूक ऐतिहासीक ठरली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधानसभेची उमेदवारी मिळवली. दुसरीकडे गेल्यावेळी क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून आमदार झालेल्या शंकरराव गडाख यांनीही निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधत मंत्रीपद मिळवले.
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निवडणुकीच्या आधी भाजपसोबत गद्दारी करत, थेट प्रहारकडून निवडणूक लढवली. या तिरंगी लढतीत तालुक्याने आजी-माजी आमदारांचा धक्कादायक पराभव करत, शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठल लंघे यांना आमदार केले. गेल्या 10-12 वर्षात तालुक्याने तीन आमदार पाहिले.
आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लंघे-गडाख हे आजी-माजी आमदार कामाला लागले आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची संधी गडाखांनी साधली.
त्यापूर्वी आ. लंघे यांनी तालुक्यातील छोट्या-मोठ्या विकासकामांचा बार उडवला. यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जरा वेगळी होणार आहे. यंदा जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत. गेल्यावेळी जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे 14 गण होते.
त्यावेळी शंकरराव गडाख गटाने सातपैकी पाच जिल्हा परिषद गटात विजय मिळवला होता. भेंडा गटात भाजपचे दत्तात्रय काळे व कुकाणा गटात राष्ट्रवादीच्या तेजश्री लंघे याच दोन जागा गडाख विरोधकांच्या हाती लागल्या होत्या.
पंचायत समितीच्या 14 जागांपैकी 12 जागा गडाख गटाने जिंकल्या होत्या. त्यावेळी फक्त भेंडा बुद्रुक गणात भाजपचे अजित मुरकुटे व शिरसगाव गणात राष्ट्रवादीच्या सुषमा खरे यांना विजय मिळवता आला होता.
खरवंडी गटातून विजयी झालेले माजीमंत्री शंकरराव गडाख यांचे चुलतबंधू सुनील गडाख हे थेट जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती झाले होते. परंतु आता सगळ्याच गट व गणांची तोडफोड झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर, तर सुनील गडाख यांना निवडणूक लढविण्यासाठी हक्काचा गटच उरलेला नाही.
नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात 8 पैकी 7 महिला, तर पंचायत समितीत 16 पैकी 8 महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.2022 साली निघालेले आरक्षण कसे होते ते आपण पाहू…
नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण
१) सोनई- इतर मागास (महिला)
२) शनिशिंगणापुर- सर्वसाधारण(महिला)
३) चांदा- अनुसूचित जाती (महिला)
४) पाचेगाव- अनुसूचित जमाती (पुरुष)
५) भानसहिवरे- इतर मागास (महिला)
६) भेंडे बुद्रुक- सर्वसाधारण (महिला)
७) सलाबतपूर- सर्वसाधारण (महिला)
८) बेलपिंपळगाव- अनुसूचित जमाती (महिला)
नेवासे पंचायत समितीचे आरक्षण
१) सोनई- (सर्वसाधारण महिला)
२) घोडेगाव-(अ.जाती)
३) शनिशिंगणापुर-(सर्वसाधारण महिला)
४) खरवंडी-(सर्वसाधारण महिला)
५) करजगाव-(नागरिकांचा मागास प्रवर्ग)
६) चांदे-(सर्वसाधारण)
७) देडगाव-(नागरिकांचा मागास प्रवर्ग)
८) बेलपिंपळगाव- (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
९) प्रवरासंगम-(अनुसूचित जाती महिला)
१०) खामगाव- (सर्वसाधारण)
११) सलबतपूर- (सर्वसाधारण)
१२) कुकाणे- (सर्वसाधारण)
१३) भेंडे- (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
१४) मुकिंदपुर-(सर्वसाधारण महिला)
१५) भानसहिवरे- (सर्वसाधारण महिला)
१६) पाचेगाव-(अनुसूचीत जाती)
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण पाहता नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा महिला राज येण्यार आहे. जिल्हा परिषदेच्या आठपैकी सात जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळच्या अनेक नेत्यांची पंचाईत होणार आहे. आजी-माजी आमदारांना त्या-त्या आरक्षणाची महिला शोधतानाही कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे गट व गणाची तोडफोडही डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहेत. अनेक स्थानिक नेत्यांची हक्काची गावे दुसऱ्या गटात गेल्याने ही निवडणूक कुणालाच सोप्पी असणार नाही.
तालुक्याची आमदारकी बदलल्यानंतर विद्यमान आ. विठ्ठल लंघे यांनी, भाजपचे ऋषिकेश शेटे, सचिन देसर्डा यांना हाताशी धरून पंचायत समितीवर झेंडा फडकविण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अनेक कार्यक्रमात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दिसले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लंघे- मुरकुटे युती झाली, तर ती गडाखांसाठी डोकेदुखी वाढणारी ठरणार आहे.