Explained Shrigonda Politics : सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्याचे हाँट राजकारण जिल्ह्याने पाहिले. एक, दोन नव्हे तर, तब्बल 4 तगड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद आजमावली होती. निकालापर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंनी आपला करिश्मा कायम ठेवला आणि त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते आयुष्यातील आपल्या पहिल्याच निवडणुकीत आमदार झाला. आता मिनी आमदारकी समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पाचपुते यांच्यासह जगताप, नागवडे यांच्यासारखे दिग्गज पुन्हा कामाला लागले आहेत. श्रीगोंदा पंचायत समितीत काय होऊ शकतं? जिल्हा परिषद गटात काय स्थिती आहे? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
श्रीगोंदा हा तीन साखरसम्राटांचा, व तब्बल अर्धा डझन दिग्गज नेत्यांचा तालुका. या तालु्क्यात प्रत्येक निवडणूक ही थेट हमरी-तुमरीपर्यंत रंगते. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे राजकारण दरवेळी बदलते. लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने महाविकास आघाडीला डोक्यावर घेतले. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची म्हणजे भाजपची जादू चालली. आयुष्यातील पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या, विक्रम पाचपुते यांना तालुक्याने उचलून धरले. माजी आ. राहुल जगताप, साखर सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा नागवडे यांना दारुन पराभव पहावा लागला. तालुक्याचे बाँस समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची जादू विधानसभा निवडणुकीत चालली. अर्थात जगताप- नागवडे यांच्या मतविभागणीचा फायदा त्यांना झाला.

गेल्यावेळी म्हणजेच 2017 ला झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत या तालुक्यात भाजपचेच वजन होते. भाजपचे 7, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 सद्सय निवडून आले. सुरुवातीच्या अडीच वर्षे खुर्चीवर बसल्यानंतर पुरुषोत्तम लगड व प्रतिभा झिटे या सभापती-उपसभापतींनी राजीनामा दिला. पाचपुते गटाचे शहाजी हिरवे व मनीषा कोठारे यांची निवड निश्चित मानली जाऊ लागली. परंतु आरक्षणात हे पद अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिले. त्यानंतर भाजपने उमेदवार बदलत सभापतीपदासाठी अमोल पवार यांचे नाव निश्चित केले. परंतु शेवटच्या अडीच वर्षात विरोधकांनी फासे टाकले.
अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. भाजपने ऐनवेळी नानासाहेब ससाणे व उपसभापतीपदासाठी मनीषा कोठारे यांची नावे पुढे केली. अमोल पवार यांचे सदस्यत्व रद्द झाले तरी, भाजपकडे सहा व आघाडीकडे पाच सदस्य होते. त्यामुळे पुन्हा भाजपचाच सभापती होईल, असे दिसत असताना राजकारण फिरले. बाबासाहेब भोस यांच्या कार्यकर्त्या समजल्या जाणाऱ्या आशा गोरे यांनी ऐनवेळी आघाडीला पाठींबा दिला. त्यामुळे भाजपचे मत कमी होऊन राहुल जगताप गटाच्या गीतांजली पाडळे व रजनी देशमुख यांच्या गळ्यात सभापती उपसभापती पदाची माळ पडली. विशेष म्हणजे विखेंचे समर्थक समजले जाणारे आण्णा शेलार व सिद्धेश्वर देशमुख यांनीही आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले गेले.
यंदाच्या निवडणुकीत या तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची चांगलीच मोडतोड झाली आहे. शिवाय एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणही वाढले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या 14 गणांसाठी निवडणूक रंगणार आहे. 2022 साली निघालेले आरक्षण कायम राहिले तर दिग्गजांना आपले गड राखता येईल, अशी परिस्थिती आहे. पाचपुते, नागवडे, जगताप या तिन्ही नेत्यांसाठी त्यांचे जिल्हा परिषद गट सोयीचे झाले आहेत. उर्वरीत चारपैकी दोन गट अनुसूचित जाती महिला व दोन गट अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले आहेत. त्यामुळे आण्णा शेलार, सचिन जगताप यांना मात्र धक्का बसला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण कसे निघाले ते आपण पाहू…
1. पिंपळगाव पिसा (सर्वसाधारण महिला)
2. कोळगाव (अनुसूचित जाती महिला)
3. मांडवगण (अनुसूचित जाती महिला)
4. आढळगाव (अनुसूचित जाती)
5. बेलवंडी (अनुसूचित जाती)
6. लिंपणगाव (सर्वसाधारण)
7. काष्टी (सर्वसाधारण)
आता श्रीगोंदा पंचायत समिती गणांचे आरक्षण आहे, ते आपण पाहू…
1. देवदैठण गण-सर्वसाधारण
2. पिंपळगाव पिसा-ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
3. कोळगाव गण-ना.मा.प्रवर्ग(BCC)
4. घारगाव गण-सर्वसाधारण महिला
5. मांडवगण गण-सर्वसाधारण
6. भानगाव गण-अनुसूचित जाती महिला(SC)
7. आढळगाव गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
8. पेडगाव गण-अनुसूचित जाती
9. येळपणे गण-सर्वसाधारण महिला
10. बेलवंडी गण-सर्वसाधारण महिला
11. हंगेवाडी गण-सर्वसाधारण
12.लिंपणगाव गण-सर्वसाधारण
13. काष्टी गण-सर्वसाधारण
14. अजनूज गण-अनुसूचित जमाती महिला
पिंपळगाव पिसा गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिले राहिल्याने अगोदरपासून तयारी करणार्या डॉ. प्रणोती जगताप याची सोय झाली आहे. लिंपणगाव गटात नागवडे यांचे वर्चस्व असणारे गावे असल्याने हा गट सर्वसाधारण झाला असल्याने इथे नागवडे यांना सोयीचे झाले आहे. काष्टी गट सर्वसाधारण असल्याने आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची हक्काची गावे या गटात असल्याने त्यांच्या सोयीचा गट बनला आहे.
काष्टी गट पाचपुतेसाठी, लिंपणगाव नागवडेसाठी आणि पिंपळगाव पिसा जगताप यांच्यासाठी सोयीस्कर गट आरक्षण निघाले आहे. मात्र कोळगाव गटात अनुसूचित जाती महिला वर्गाचे आरक्षण निघाले. मांडवगण हा परंपरागत बालेकिल्ला असणारे सचिन जगताप यांना मात्र नव्याने निघालेल्या आरक्षणाचा फटका बसला. मांडवगण गट अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव बनला. आढळगाव जिल्हा परिषदेत देखील अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांचा पत्ता कट झाला आहे.
बेलवंडी गटाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार याना धक्का बसला आहे.आता हे आरक्षण असेच राहिले तर पाचपुते, नागवडे व जगताप हे साखरसम्राट आपापले गड शाबूत राखण्यासाठी घनघोर लढाई करताना दिसतील. त्याऊलट आण्णा शेलार, सचिन जगताप यांना मात्र त्या-त्या आरक्षणाच्या उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे.