Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …

Published on -

कोपरगाव तालुका हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काळे व कोल्हे सहकारी साखर कारखान्याभोवतीच या तालुक्याचे राजकारण फिरते. यापूर्वी कोपरगावची विधानसभा निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काळे व कोल्हे गटांभोवतीच फिरत आल्या आहेत. गेल्या विधानसभेला मात्र चमत्कार झाला, आणि कोल्हेंनी अनेपेक्षित माघार घेत, काळेंना आमदार केले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही सहमती एक्सप्रेस धावेल का, हा खरा प्रश्न आहे.

कारण विधानसभेला जरी या दोन्ही घराण्याने हातात हात घातले असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या त्यापेक्षा वेगळ्या आहेत. प्रत्येक निवडणूक व निवडणुकीतील मुद्दे व गुद्दे हे वेगवेगळे असतात. त्यामुळे यंदा कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होईल? व काय होऊ शकते? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

मित्रांनो, हा विषय समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला कोपरगाव तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास समजून घ्यावा लागेल. कोपरगाव हा सहकाराचा तालुका असला तरी, येथील राजकारण हे काळे व कोल्हे या प्रमुख दोन घराण्यांभोवतीच चालते. परजणे- औताडे या घराण्यानेही आपले राजकीय वजन जपलेले आहे. दोन साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, सोसायट्या या येथील राजकारणाची धमणी समजल्या जातात. 2016 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांनी त्यावेळी ग्रामीण भाग पिंजून काढत, जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या 10 गणांत स्पष्ट बहुमत मिळवले होते.

पंचायत समितीच्या 10 गणांपैकी काळे गटाला 6 जागा, परजणे गटाला 2 जागा, तर शिवसेना व भाजप म्हणजेच कोल्हे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादी व काँग्रेस म्हणजेच काळे- परजणे गटात आघाडी होऊन सभापती व उपसभापती राष्ट्रवादीचे झाले होते.

2016 ते 2019 या अडीच वर्षांच्या काळात आ. काळे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव विकास कामे केली. त्याच जोरावर आ. आशुतोष काळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निसटता का होईना, पण विजय मिळवला होता. योगायोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि आ. काळे यांनी विकासकामांचा वेग कायम ठेवला. त्यानंतर आ. काळे अजित पवार गटात गेले व तालुक्याची विकासकामे पुढच्या अडीच वर्षेही सुरु ठेवली.

स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा या दोन्हींची सांगड घालत आ. काळे यांनी एवढी विकासकामे केली की, 2024 च्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले. अर्थात युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली व आ. काळेंचे काम इमाने-इतबारे केले. त्याचा फायदाही मतदानात दिसला.

आता यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. म्हणजेच आता कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पोहेगाव व चांदेकसारे गटाने आ. काळेंना शेवटच्या क्षणी निर्णायक आघाडी दिली होती, त्या गटांतील गावे यावेळी तुटली आहेत. नवीन तयार झालेल्या दोन गणांच्या बाबतीतही काहीसे तसेच चित्र आहे. नाव गट व नवे गण हे राष्ट्रवादीसाठी जास्त अनुकूल दिसत नाहीत. नव्या प्रारुप आराखड्यात आ. काळे गटाला 2016 च्या निवडणुकीत जे यश मिळाले, तसे यश यंदाही मिळेल, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. दुसरीकडे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोल्हे गटही कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे चित्र आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही काळे व कोल्हे गटांत पारंपारिक पद्धतीने होते असा इतिहास आहे. या दोन्ही नेत्यांचे स्थानिक गट या निवडणुकांत आपली ताकद आजमावतातच. शिवाय संवत्सर व पोहेगाव गटात तिरंगी लढतही होते. उमेदवाराचा जनसंपर्क, त्याची लोकांतील प्रतिमा व उमेदवारांचे नातेगोते या सगळ्या मुद्यांवर कोपरगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. जिल्हा परिषदेचा विचार केला तर कोपरगाव तालुक्यात

1. सुरेगाव गट
2. शिंगणापूर गट
3. करंजु बुद्रुक गट
4. संवत्सर गट
5. पोहेगाव गट
आणि
6. चांदेकसारे गट

असे सहा गट आहेत. पंचायत समिती गणाचा विचार केला तर,

1. सुरेगाव गण
2. धामोरी गण
3. शिंगणापूर गण
4. ब्राम्हणगाव गण
5. करंजी बुद्रुक गण
6. दहेगाव बोलका गण
7. संवत्सर गण
8. कोकमठाण गण
9. पोहेगाव बुद्रुक गण
10. कोळपेवाडी गण
11. चांदेकसारे गण
आणि
12. रांजणगाव देशमुख गण

असे एकूण बारा गण आहेत.

त्यात 2022 रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीत कोपगाव तालुक्यातील गणात…

1. सुरेगाव गणात- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
2. धामोरी गण- सर्वसाधरण
3. शिंगणापूर गण- अनुसूचित जाती
4. ब्राम्हणगाव गण- अनुसूचित जमाती
5. करंजी बुद्रुक गण- सर्वसाधारण
6. दहेगाव बोलका गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
7. संवत्सर गण- अनुसूचित जाती महिला
8. कोकमठाण गण- सर्वसाधारण महिला
9. पोहेगाव बुद्रुक गण- सर्वसाधारण
10. कोळपेवाडी गण- अनुसूचित जमाती महिला
11. चांदेकसारे गण- सर्वसाधारण महिला
आणि 12. रांजणगाव देशमुख गण- सर्वसाधारण महिला

असे आरक्षण पडले होते. त्यामुळे हेच आरक्षण कायम राहिले तर, अनेक नेत्यांची गोची होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्यातील महायुतीची स्ट्रॅटजी व काळे-कोल्हेंची बाँडी लँग्वेज पाहता कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या बिनविरोध करुन ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या हालचालीही सुरु होतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. असे झाले तर, कोपरगाव पंचायत समितीचा सभापती म्हणून काळे व कोल्हे गटाला आलटून पालटून संधी मिळेल, असेही बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News