Gratuity Money Rule 2025 | 10 वर्ष नोकरीं केली अन शेवटचा पगार 40 हजार असेल तर किती ग्रॅच्यूटी मिळणार ?

Tejas B Shelar
Published:

Gratuity Money Rule 2025 : सरकारी नोकरदार असो किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी निवृत्त झालेत की त्यांच्या नजरा त्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभाकडे असतात. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्यूटीचा लाभ मिळत असतो.

त्यांनी त्यांच्या सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ही रक्कम त्यांना दिली जात असते. पण ग्रॅच्युइटी म्हणजे नेमके काय? जाणकार सांगतात की, ग्रॅच्युइटी म्हणजे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कंपनीत केलेल्या कामासाठी दिली जाणारी बक्षीसरुपी रक्कम.

जर एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे काम करत असेल तर त्याला निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर कंपनीकडून बक्षीस म्हणून एक ठराविक रक्कम दिली जाते आणि याचं रकमेला ग्रॅच्युइटी म्हणतात. पण मंडळी तुम्ही ग्रॅच्युईटी नेमकी कशी मोजली जाते?

यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो? एखाद्या व्यक्तीने दहा वर्षे कंपनीत काम केले असेल तर त्याला नियमानुसार किती ग्रॅच्युइटी मिळणार? या गोष्टींचा कधी विचार केला आहे का. नाही ना मग आज आपण याच साऱ्या मुद्द्यांचा अगदी तपशीलवार आढावा घेणार आहोत.

ग्रॅच्युइटी मोजण्याचा फॉर्म्युला नेमका कसा आहे?

अनेकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक फॉर्मुला वापरला जातो.

( शेवटचा पगार ) x (नोकरीचा कालावधी ) x (15/26) हा ग्रॅच्युईटी मोजण्याचा फॉर्मुला आहे. यामध्ये महिन्यातील रविवारचे ४ दिवस आठवड्याची सुट्टी असल्याने ते गणले जात नाहीत. म्हणजे एका महिन्यात तीस दिवस न मोजता केवळ २६ दिवस मोजले जातात आणि १५ दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युइटीची रक्कम काढली जात असते.

कोणत्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते?

मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी दिली जाते मात्र सर्वच कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो का? तर उत्तर आहे नाही. नियमानुसार भारतात एखाद्या कंपनीत १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील तर अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते,

यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर दुकाने, कारखाने यांचा सुद्धा यात समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतात किमान पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाचं ग्रॅच्युइटी मिळते.

जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांने कंपनीत चार वर्षे आणि आठ महिने काम केले असेल तर अशा कर्मचाऱ्याला सुद्धा ग्रॅच्युइटी मिळणार आहे. पण चार वर्षे आणि आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी केली असेल तर ग्रॅच्युटी मिळणार नाही.

अशा प्रकरणांमध्ये सदर कर्मचाऱ्यांची सेवा ही फक्त चार वर्षाची समजली जाईल. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नोटीस पिरियड सुद्धा नोकरीचा कालावधी म्हणून गणला जाणार आहे.

म्हणजे एखाद्या कर्मचार्‍याने जर चार वर्षे सहा महिने काम केले असेल आणि त्याला अतिरिक्त दोन महिन्याचा नोटीस पिरियड दिलेला असेल तर अशा प्रकरणांमध्ये त्या कर्मचाऱ्यांची सेवा चार वर्षे आणि आठ महिने म्हणून गणली जाणार आहे आणि तो ग्रॅच्यूटीसाठी पात्र ठरणार आहे.

10 वर्षाची सेवा आणि शेवटचा पगार 40000 असल्यास किती ग्रॅच्युइटी मिळणार?

ज्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार 40 हजार रुपये असेल आणि ज्याने 10 वर्ष कंपनीत काम केले असेल त्याला किती ग्रॅच्यूटी मिळणार हे समजून घेऊयात. नियमानुसार अशा कर्मचाऱ्याला (40000×10)×(15/26) = दोन लाख तीस हजार 769 रुपये ग्रॅच्युटी म्हणून मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe