अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- शरद पवार हे नाव कायमच देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असते. निवडणूक असो किंवा गडबड-घोटाळा अशा ठिकाणी शरद पवारांची नियोजन, भूमिका आणि ऐनवेळी घेतलेली भूमिका या वातावरण बदलवणाऱ्या असतात.

‘अवघे 4 खासदार असताना शरद पवार यांची भूमिका कायम दिल्लीत दखलपात्र असते आणि अवघ्या 4 खासदारांच्या जीवावर देशाच्या वातावरणात बदल घडून आणण्याची क्षमता पवार ठेवतात, हे कसं शक्य करतात, त्याचं त्यांनाच माहिती’, अशा शब्दात विरोधक कायम पवारांचं कौतुक करतात.
तर देशाचे पंतप्रधान मोदी बारामतीत येऊन मी पवारांचे बोट धरून राजकारण करायला शिकल्याचे कबूल करतात. शरद पवार हा संशोधनाचा विषय आहे, असे विरोधक गांभीर्याने म्हणतात. शरद पवारांना संपवायला निघालेले संपले पण पवार अजूनही रणात आहेत आणि जिंकत आहेत.
माध्यम, विरोधकांनी आजवर अनेक आरोप पवारांवर केले पण एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून पवारांची देशाच्या राजकारणात ओळख आहे. शरद पवारांचे अनेक किस्से, वदंता आहेत, ज्या गेल्या 3-4 पिढ्यांनी ऐकल्या आहेत.

मात्र आज आम्ही जो किस्सा तुम्हाला सांगणार आहोत, तो तुम्ही कदाचितच ऐकला, वाचला असेल. कारण हा किस्सा शरद पवारांची राजकीय घडण होत होती, त्या काळातील आहे. साल 1967 होते, कॉंग्रेस चौफेर होती. कॉंग्रेस हाय-कमांडचे महत्व जसे आज आहे, तसेच किंवा आजच्यापेक्षा कदाचित जास्तच होते. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षासमोर किरकोळ असायचे.
कॉंग्रेसकडे जे बळ होतं, त्याच्यासमोर निभाव लागणे, कुठल्याच पक्षाला शक्य नव्हते. अशातच 67 साली विधानसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी पवार हे 26 वर्षांचे होते मात्र तेव्हाही हवा नेमकी कोणत्या दिशेला आहे, याचा अचूक अंदाज त्यांना होता.
कारण स्वत:ची आई वेगळ्या पक्षात जबाबदार आणि कट्टर पदाधिकारी असताना पवार यांनी कॉंग्रेसची निवड केली होतीत्यावेळी ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. राजकारणात उतरायचं तर मोठं ध्येय बाळगूनच, अशा विचारांचे पवार हे संधीच्या शोधात होते.
निवडणूक लागणार, असे अंदाज होते. सगळीकडे तयारी सुरु झाली होती. अशातच तत्कालीन कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवारांना ‘बारामतीतून आमदारकी लढवशील का?’ अशी विचारणा केली. जास्त विचार न करता पवारांनी होकार कळवला.
ही बातमी तोपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचली होती. पवारांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर चव्हाणांचापूर्ण विश्वास होता. पण आजही एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे, कॉंग्रेसमध्ये हायकमांड जी म्हणेल तीच पूर्व दिशा असते.
हाय-कमांड या प्रकाराने कॉंग्रेसला जेवढा फायदा झाला आहे, त्यापेक्षा अधिक पटीने जास्त तोटा झाला आहे, याचे परिणाम आज आपल्याला दिसून येतात. नेमक पवारांच्या बाबतीतही हाच घोळ झाला. हायकमांड पद्धतीनुसार त्यावेळी कुणाला तिकीट द्यावे, याविषयी तालुकास्तरावर असणाऱ्या नेत्यांची मते लक्षात घेतली जायची.
किंवा एखाद्याचे उमेदवार म्हणून नाव पुढे आले असल्यास त्याला तालुका सदस्यांची/नेत्यांची समंती आहे कि नाही, हेही तपासले जायचे. शरद पवारांच्या नावाला सगळ्याच सदस्यांनी नकार दिला. आता मात्र मोठी पंचाईत झाली. युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष आणि स्वत:च्याच तालुक्यातएवढा विरोध होतो, म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार,
असा समज जिल्हा स्तरीय नेत्यांचा झाला. तालुक्यावरून आलेला अहवाल तसाच पुढे जिल्ह्याला आणि जिल्ह्याहून राज्याच्या नेत्यांना पाठवला गेला. हा अहवाल पाहून पाटील आणि चव्हाण यांना आश्चर्य वाटले. पण पवारांसारख्या उमद्या तरुणाची कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसची पवारांना गरज आहे, हे त्यांना चांगलेच ठावूक होते.
तसेच कॉंग्रेसचे अंतर्गत राजकारण कसे कुरघोडीचे आहे, याचाही पुरेपूर अंदाज असलेल्या पाटील आणि चव्हाणांनी शरद पवारांना तिकीट द्यायचे ठरवले. बारामती तालुक्याच्या नेत्यांना समजवण्याची जबाबदारी चव्हाणांनी घेतली. तसेही त्यांच्या शब्दाला नाही म्हणण्याची ताकद कुणातच नव्हती.
पण समजदार आणि सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या चव्हाणांनी बारामतीचे नेते बोलावले. 270 पैकी किती जागा विजयी होतील, असा प्रश्न पवारविरोधी गटाच्या नेत्याला चव्हाणांनी विचारला. 190-200 च्या आसपास, असे उत्तर त्या बारामतीच्या नेत्याने दिले. यावर चव्हाण म्हणाले, म्हणजे साधारण 70-80 जागा पडतील.
मग असे समजा, बारामतीची जागा आपण हरलो आणि तुम्हीच शरद पवारांना उमेदवार घोषित करा. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या एका शब्दामुळे पवारांना उमेदवारी मिळाली. आणि त्यापुढे जे घडले ते खरे आश्चर्य होते. इथे तुम्हाला लक्षात येईल, अंतर्गत राजकारण कॉंग्रेसला कसे संपवत होते.
त्याच निवडणुकीत पवार हे तब्बल दुप्पट मतांनी विजयी झाले. पुढच्या काही वर्षातच हेच पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यशवंतराव चव्हाण यांचा शरद पवारांची राजकीय कारकीर्द घडवण्यात मोठा वाटा होता. चव्हाणांच्या एका शब्दामुळे एक मोठा नेता या देशाला मिळाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम