Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वत्र धावपळ सुरु आहे. या योजनेची अगदीच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आहे. अर्ज करण्यासाठी तर काहीजण या योजनेतून मिळालेले पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धरतीवर सुरू करण्यात आली आहे.
राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात एका पात्र महिलेला 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.

वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आणि 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
फक्त महाराष्ट्रातील महिलांनाचं याचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला परराज्यात जन्माला आलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र असतील.
या योजनेचा जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या बहुतांशी महिलांना लाभ मिळाला आहे. जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेले पण पैसे न मिळालेल्या उर्वरित महिलांचे अर्ज पडताळणी नंतर त्यांनाही लाभ मिळेल.
विशेष म्हणजे या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ऑगस्टअखेर पर्यंत दोन कोटी हून अधिक महिलांनी अर्ज केले असून अनेकांना याचे पैसे मिळाले आहेत.
खरं तर या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, सरकारने 31 ऑगस्ट ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
म्हणजेच ऑगस्टनंतरही महिलांना अर्ज करता येणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळणार की नाही? तर आता याच संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोलीतून दिली आहे.
आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही योजना यापुढेही सुरूच राहणार आहे.
मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल. म्हणजेच 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीत.













