Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती.
सुरुवातीला ही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत होती. मात्र नंतर मुदत वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली. आता या योजनेची मुदत ही संपली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना आत्तापर्यंत एकूण पाच हप्ते मिळाले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच ज्या पात्र महिलांना जुलै महिन्यापासून याचा लाभ मिळत आहे त्यांच्या खात्यात आत्तापर्यंत 7500 जमा झाले आहेत.
दरम्यान या चालू महिन्यात ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर या योजनेचा लाभ हा सर्वच महिलांना मिळत नाही. या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जातो मात्र या वयोगटातील साऱ्याच महिलांना याचा लाभ मिळत नाही.
यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती लावून दिलेल्या आहेत. दरम्यान आज आपण या योजनेचा लाभ नेमका कोणत्या महिलांना मिळत नाही याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेच्या अटी काय आहेत
1) या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो. तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला यासाठी पात्र ठरतात.
2) याचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो. अर्थातच 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळत नाही.
3) राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतो. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरते.
4) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही.
5) लाभार्थी महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे बँक खाते आधार सोबत लिंक नसेल त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
6) कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
7) कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाही.
8) कुटुंबात जर ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
9) कुटुंबातील कोणतीही सदस्य आजी किंवा माजी खासदार/आमदार असेल तर अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
10) शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
11) कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचा अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार नाही.