Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात गल्लीबोळापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. ती चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत. ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजे एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात आहेत. यासाठी नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. मात्र एप्लीकेशनवर अर्ज भरताना महिलांना काही अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे आता सरकारने याच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरु केले आहे.
या नवीन पोर्टलवर म्हणजेच संकेतस्थळावर आता महिलांना अर्ज भरता येणार आहेत. मात्र, या योजनेसाठी आधी सुरू असलेले अॅप बंद करण्यात आले आहे. यामुळे महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवीन वेबसाईट सुरू झाल्यामुळे महिलांना जलद गतीने अर्ज भरता येतील अशी आशा होती.
मात्र वेबसाईट सुरू करतांनाचं सरकारने या योजनेचे अँप्लिकेशन बंद केले. म्हणजे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी नवीन नोंदणी करायची असल्यास केवळ पोर्टलवरूनच करता येणार आहे. पण फक्त वेबसाईटचं सुरू असल्याने नोंदणी करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
खरे तर ग्रामीण भागात या योजनेसाठी अर्ज करण्याकरीता महिला मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांकडे जात आहेत. अंगणवाडी सेविका आपले काम योग्य पद्धतीने पारही पाडत आहेत. घरोघरी जाऊन मोबाइलवरून नोंदणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून चोखपणे पार पाडले जात आहे.
पण, आता अॅप बंद करण्यात आले आहे. म्हणुन आता घरोघरी जाऊन नोंदणी कशी करायची, हा प्रश्न अंगणवाडी सेविकांच्या पुढे निर्माण झाला आहे. दरम्यान, जुन्या अॅपवरून केलेल्या नोंदणीचा डाटा अजून पोर्टलवर घेण्यात आलेला नाही.
यामुळे जुन्या नोंदींबाबत माहितीसाठी अॅप वापरावे लागत आहे. नवीन पोर्टल सुरू झाले आहे मात्र हे पोर्टलही व्यवस्थित चालत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
या सरकारच्या निर्णयामुळे नवीन नोंदणी ही पूर्णपणे ठप्प झाली असल्याचे दिसत आहे. परिणामी आता पोर्टल तातडीने दुरुस्त व्हावे आणि पोर्टलप्रमाणेच जुने अॅपही सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
योजनेचे पैसे कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या आधीच म्हणजेच 19 ऑगस्ट आधीच पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. मात्र ही योजना जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै महिन्याचे देखील पैसे महिलांना दिले जाणार आहेत. म्हणजे महिलांना जुलै अन ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत.