Maharashtra New Expressway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झाले आहेत. अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे.
सध्या स्थितीला या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे उर्वरित 76 किलोमीटरचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
पुढे 2024 मध्ये भरवीर ते ईगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि आता समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे तर दुसरीकडे याच्या विस्ताराच्या कामासाठी देखील हालचाली वाढल्या आहेत. समृद्धी महामार्गाचा विस्तार थेट गोंदियापर्यंत केला जाणार असून याच विस्तारित महामार्गासंदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन सुरू झाले असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या विस्तारित महामार्ग प्रकल्पामुळे विदर्भातील गोंदिया व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. जेव्हा हा विस्तारित मार्ग पूर्ण होईल तेव्हा गोंदिया ते मुंबई हा प्रवास अवघ्या आठ ते दहा तासात पूर्ण करता येईल असा दावा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो.
समृद्धी महामार्ग गोंदियापर्यंत पूर्ण झाला तर गोंदिया जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्राला फायदा होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या विस्ताराचा सर्वाधिक फायदा कृषी क्षेत्राला मिळणार अशी आशा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे म्हटले जात आहे.