Maharashtra Rain : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशातून माघार घेतली आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरलाय खरा पण ईशान्य मोसमी पाऊस दक्षिणेकडील राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे जोरदार पाऊस सुरू आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्यातील जाणकारांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून आज आणि उद्या सुद्धा राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये जाहीर केले आहे.
याशिवाय अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि धाराशिव जिल्हा वगळता संपूर्ण मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या अर्थातच 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे उद्या विदर्भ विभागातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला असून या अनुषंगाने विदर्भातील या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान सध्या सुरू असणारा हा पाऊस आगामी रब्बी हंगामातील पिकांसाठी वरदान ठरवू शकतो असे महत्त्व कृषी क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवले आहे. सध्याच्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.