Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने मान्सूनने महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातून माघार घेतली असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. 15 ऑक्टोबरला मान्सून देशातून बाहेर पडला आहे. नैऋत्य मौसमी पाऊस देशाच्या हद्दीबाहेर गेला असून दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातही येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असे जाहीर केले आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यात कधीपासून पावसाचा जोर वाढणार, कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार? या संदर्भात नेमके काय म्हटले आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणतय भारतीय हवामान खाते ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोकण विभागात म्हणजेच मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये अर्थातच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर कमीच राहणार असे दिसते. या काळात या भागांमध्ये फक्त ढगाळ हवामान राहील आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडणार अशी शक्यता जाणवत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी वर्तवला आहे.
परंतु 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पाच दिवसांच्या काळात कोकणातील मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भ विभागातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज भारतीय हवामान खात्यातील तज्ज्ञांनी यावेळी दिला आहे.
यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि मागे जसा पाऊस झाला तसा पाऊस आगामी काळात होणार नाही असेच जाणवते यामुळे शेतकऱ्यांनी फारशी काळजी करू नये परंतु काढणी झालेला शेतमाल सुरक्षित साठवून ठेवावा असे बोलले जात आहे.