Mhada News : महाराष्ट्रात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांसाठी घर घेणे मोठे मुश्किल बनले आहे. तथापि, म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून दिली जात आहे.
यामुळे, अनेकजण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुम्हीही म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाने काही घरांसाठी आणि भूखंडासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मंडळाने 941 घर आणि 361 भूखंडांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या या योजनेत छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथे घरे आणि भूखंड उपलब्ध करून दिलेली आहे.
दरम्यान म्हाडाच्या या नव्याने जाहीर झालेल्या लॉटरीसाठी आजपासून अर्थातच 28 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, integrated housing lottery management system (IHLMS 2.0) या नव्या पद्धतीनं आणि अॅपच्या सहाय्यानं या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.
या एप्लीकेशनमध्ये अर्ज भरण्यापासून तर आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे या लॉटरी समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना सहजतेने यासाठी अर्ज करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान या सोडतीची अंतिम यादी 4 एप्रिल 2024 ला जाहीर केली जाणार आहे. ही यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या या योजनेची सोडत नेमकी केव्हा जाहीर होणार याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच ही देखील माहिती समोर येणार आहे.