मित्रांनो, 2024 ला निरोप देऊन आपण सारे जण 2025 मध्ये आलोय, नवीन वर्षात आपण सर्वजण नवीन संकल्प घेऊन आलोय. अनेकांनी 2025 मध्ये आपले स्वतःचे हक्काचे घर बनवण्याचा संकल्प केला असेल, जर तुम्हीही असाच संकल्प केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता, ज्यांना राजधानी मुंबईत घर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची आहे.
कारण की म्हाडा मुंबई मंडळ नववर्षात जवळपास 3000 घरांसाठी लॉटरी काढणार, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झालीये. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरांच्या किमती येथील इमारतींप्रमाणेच वाढत चालल्या आहेत. उंच-उंच इमारतींचे हे शहर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.
मराठी माणूस आता मुंबईतून हद्दबाहेर होत चालला आहे, कारण की मुंबईतील घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. हेच कारण आहे की राजधानी मुंबईत स्वतःचे घर असावे असे स्वप्न उराशी बाळगून बसलेला प्रत्येक जण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतो. म्हाडा मुंबई मंडळ दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढत असते. या नवीन वर्षातही म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून जवळपास 2500 ते 3000 घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण म्हाडाच्या या 2025 च्या नव्या लॉटरीसंदर्भातील सर्व इत्यंभूत माहिती जसे की, ही लॉटरी केव्हा निघणार, लॉटरी मध्ये कोणत्या भागातील घरांचा समावेश असणार, कोणत्या उत्पन्न गटातील नागरिकांसाठी यात घरे असणार ? अशा सर्व बाबींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मंडळी, 2025 मध्ये म्हाडा मुंबई बोर्डाच्या माध्यमातून जवळपास अडीच ते तीन हजार घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. मंडळाकडून याबाबतचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून या आगामी लॉटरीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी जास्तीत जास्त घरे राखीव ठेवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या परवडणाऱ्या किमतीतील या घरांची लॉटरी दिवाळीच्या आसपास काढली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थातच ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान ही लॉटरी निघेल अन या लॉटरीत मुंबईतील उपनगरातील घरांचा समावेश असेल. पश्चिम उपनगरातील गोरेगाव पहाडी येथे दोन वर्षांत अडीच हजार घरे बांधली जाणार आहेत.
नव्या वर्षात काढण्यात येणाऱ्या या लॉटरीत यापैकी काही घरांचा समावेश असणार आहे. तसेच अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोली, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांचा सुद्धा यात समावेश असेल, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
आता आपण या घरांच्या किमती किती राहणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये तत्कालीन गृहमंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती बाबत मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की म्हाडाच्या घरांच्या किमती पुढील सोडतीपासून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यामुळे या नववर्षातील लॉटरी मध्ये समाविष्ट घरांच्या किमती कमीच राहतील अशी आशा आहे. या घरांच्या किमती नेमक्या किती राहणार ? याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण या घरांच्या किमती 25 ते 30 लाखाच्या दरम्यान असायला हव्यात जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना देखील मुंबईत घर खरेदी करता येईल असे बोलले जात आहे.
राज्यातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असतात. म्हाडाकडूनही अल्प दरात घरे उपलब्ध करुन दिले जातात. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याच्या मोहिमेचाचं पुढील टप्पा म्हणून म्हाडा मुंबई मंडळाकडून दिवाळीमध्ये नव्याने घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.