Myanmar Thailand Earthquake : जगाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. म्यानमारमध्ये आणि थायलंडमध्ये प्रचंड 7.7 तीव्रतेचा भूकंप आला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवित हानी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारताने देखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि म्यानमार आणि थायलंड या देशांना मदतीचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. खरंतर थायलंड हे भूकंपाचे हॉटस्पॉट नाही मात्र म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचा तीव्र परिणाम शेजारील थायलंडमध्येही जाणवला आहे. यावेळी आलेल्या भूकंपात थायलंड मधील अनेक मोठमोठ्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार थायलंड येथील बँकॉकमध्ये एक 30 मजली निर्माणाधीन इमारत पूर्णतः कोसळली असून, त्याखाली 80 हून अधिक लोक अडकले आहेत. यामुळे याबाबत संपूर्ण जगात चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, भूकंपाचा हॉटस्पॉट असणाऱ्या म्यानमारमध्येही या विनाशकारी भूकंपामुळे 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण हा भूकंप येण्याचे नेमके कारण काय याचा एक आढावा घेणार आहोत.
खरेतर, भूकंपाचा केंद्रबिंदू हा म्यानमारच्या सागाइंग शहरात होता, जिथे 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत अन यामुळे साहजिकच या ठिकाणी अधिक विनाशकारी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी अवघ्या 50 मिनिटांत सलग तीन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असल्याची माहिती दिली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या ठिकाणी पहिला आणि सर्वात तीव्र धक्का सकाळी 11.50 वाजता जाणवला, त्यानंतर 12 वाजता आफ्टरशॉक्स जाणवले, तर 12.30 ते 1 दरम्यान दुसरा मोठा धक्का बसला. पुढील आफ्टरशॉक्स तुलनेने कमी तीव्रतेचे असले तरी आधीच कमकुवत झालेल्या इमारतींना अधिक धोका निर्माण झाला आहे अन यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरेतर, म्यानमारच्या ज्या सागाइंग फॉल्ट लाईनवर हा भूकंप झाला आहे तो भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूभागात भूकंप वारंवार होण्याची शक्यता असते.
भूकंपाचे धक्के बसण्याचे कारण काय?
वास्तविक, या भागात म्हणजे म्यानमार मध्ये यापूर्वीही सातच्या वर तीव्रतेचे भूकंप आले आहेत. भारतीय आणि यूरेशियन प्लेट्सची टक्कर होत असल्यामुळे या प्रदेशात वारंवार भूकंप होत असतात. भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, भूस्तरात अशा हालचाली सतत होत असतात, मात्र जेव्हा या प्लेट्समध्ये तीव्र टक्कर होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात भूंकपाचा धक्का बसतो.
म्यानमार हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे पण थायलंड भूकंप प्रवण क्षेत्र नाही. मात्र तरीही शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा प्रभाव येथे जाणवतो. विशेषतः बँकॉक शहरातील मातीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने तेथील इमारतींच्या पायाभूत रचनेवर परिणाम होतो. त्यामुळे आताच आलेल्या या महाभयंकर भूकंपाच्या धक्क्यांमुळे शहरातील अनेक इमारतींना तडे गेले असून काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी पुढील 24 तासात आणखी भूकंपाचे धक्के जाणवू शकतात, असा इशारा सुद्धा यावेळी दिला आहे. यामुळे तज्ञांनी या भागातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. म्यानमार मधील भूकंपाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता, म्यानमारमध्ये येणारे भूकंप नवीन नसून 1930 ते 1956 दरम्यान सागाइंग फॉल्ट लाईनवर सातच्या आसपास तीव्रतेचे भूकंप या आधीसुद्धा आले होते.
दरम्यान, हा फॉल्ट देशाच्या मध्यातून जात असल्याने याच्या प्रभावाखालील भागांमध्ये भूकंपाचा धोका कायमच मोठा राहिला आहे. भूकंपाचा पहिला मोठा धक्का बसल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच दुसरा 6.4 तीव्रतेचा धक्का बसला, ज्यामुळे विध्वंस अधिक वाढला. थायलंडमध्ये इमारती भूकंपाच्या तीव्र झटके सहन करण्याच्या क्षमतेने बांधल्या जात नाहीत. त्यामुळे या भागातील इमारतींना मोठ्या प्रमाणात फटका बसतो.
बँकॉकमध्ये कोसळलेल्या इमारतीसह अनेक ठिकाणी संरचनात्मक नुकसान झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या भूकंपामुळे संपूर्ण दक्षिणपूर्व आशियातील भूकंपविषयक धोक्यांवर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आता पुढे काय होते? म्यानमार मध्ये आणि थायलंडमध्ये आणखी भूकंपाचे धक्के बसणार का याकडे विशेष लक्ष राहणार आहे.