Petrol Pump Commission : गेल्या काही वर्षांच्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळत आहे. सरकार देखील ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून प्रोत्साहित करीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारकडून सबसिडी देखील दिली जाते.
मात्र असे असले तरी आजही इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलची वाहने अधिक वापरले जातात. यामुळे देशात नेहमीच पेट्रोल आणि डिझेल ला मागणी असते आणि म्हणूनच पेट्रोल पंप चालक डिझेल आणि पेट्रोल विक्रीतून चांगली कमाई करत आहेत. अशा स्थितीत अनेकांना पेट्रोल पंप सुरू करायचे आहे.

पण पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लायसन्स कसे मिळवले जाते, यासाठी किती पैसा खर्च होतो, पेट्रोल आणि डिझेल विक्री केल्यानंतर पंप चालकांना किती कमिशन मिळतं ? या सर्व गोष्टींची माहिती नसते आणि आज आपण याचबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत.
पेट्रोल पंप साठीचे लायसन्स कुठून मिळते?
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून डीलरशिप घ्यावी लागते. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, रिलायन्स पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांकडून पेट्रोल पंपासाठी लायसन्स दिले जाते. या कंपन्या वृत्तपत्रांमधून यासाठी जाहिरात सुद्धा देतात.
जर तुम्हाला याबाबतची अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही http://www.petrolpumpdealerchayan.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. तसेच अर्ज करताना अर्जदाराला काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
सर्वसामान्य अर्जदारासाठी आठ हजार रुपये अर्ज फी लागते आणि एससी तसेच एसटी कॅटेगिरी मधील अर्जदारांना दोन हजार रुपये इतकी फी लागते. संबंधित कंपन्यांकडून पेट्रोल पंप ची डीलरशिप मिळाल्यानंतर किंवा परवाना मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाची, नगरपालिकेची तसेच अग्निशमन विभागाची परवानगी सुद्धा घ्यावी लागते. पेट्रोल पंप चालवण्यासाठी आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज भासते.
पेट्रोल पंपासाठी किती खर्च करावा लागतो 21 ते 60 वर्ष वय असणाऱ्या भारतीय नागरिकांना पेट्रोल पंपासाठी अर्ज करता येतो. पेट्रोल पंपासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक असते किंवा पंधरा ते वीस वर्षांसाठी भाडेपट्ट्यावरील जमीन असणे आवश्यक असते.
तुम्ही जर ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करणार असाल तर तुमच्याकडे 1500 ते 1600 चौरस मीटर इतकी जमीन आवश्यक आहे आणि जर तुम्ही शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करणारा असाल तर तुमच्याकडे 800 ते 1200 चौरस मीटर इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
पेट्रोल पंपासाठी वर्दळीच्या ठिकाणी आणि रस्त्यालगत जमीन असणे आवश्यक आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात जर पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर साधारणतः 20 ते 25 लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो आणि शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास 45 ते 50 लाख रुपयांचा खर्च गृहीत धरायला हवा.
पंपचालकांना किती कमाई होते
पेट्रोलच्या विक्रीतून पंप चालकांना 4.39 रुपये प्रति लिटर आणि डिझेल विक्रीतून 3.02 रुपये प्रति लिटर इतके कमिशन मिळते. म्हणजे जर समजा एखाद्या पंपावर दररोज पाच हजार लिटर पेट्रोल विकले जात असेल तर त्यांना 21 हजार 950 रुपये इतके कमिशन मिळते.
तसेच जर दररोज 5000 लिटर डिझेल विकले जात असेल तर त्यांना पंधरा हजार शंभर रुपये कमिशन मिळते. म्हणजे जर एखाद्या पंपावर दररोज पाच हजार लिटर पेट्रोल आणि पाच हजार लिटर डिझेल विकले जात असेल तर त्यांना 37 हजार रुपये कमिशन मिळणार आणि यामध्ये जर 50 टक्के खर्च वजा केला तर जवळपास साडे सतरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.