Property Rights : भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र आजही अनेकांना या कायद्यांची फारशी माहिती नाहीये. आपल्या देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून येत्या काही दिवसांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे.
मात्र आजही आपल्या देशातील विचारसरणीमध्ये पूर्णपणे बदल झालेला दिसत नाही. आजही मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणे अधिकार नसतो असा समज लोकांचा आहे. खरंतर भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिले आहेत. वडिलांच्या संपत्तीत भावाप्रमाणेच बहिणींना देखील समान अधिकार मिळतो.

मात्र कायदे असले तरी देखील अनेकांना मुलीला वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहत नाही अशीच धारणा लोकांचे आहे. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू शकत नाही असे म्हणतात.
दरम्यान काही लोकांच्या माध्यमातून जर मुलीला लग्नामध्ये हुंडा दिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळतो की नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
अशा परिस्थितीत आज आपण याबाबत कायद्यात काय म्हटले आहे? खरच मुलींना हुंडा दिला असला तर तिला लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीत अधिकार मागता येत नाही का? याबाबत उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे? याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो 2005 पासून भारतात मुलांना आणि मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असले तरीदेखील तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो असे भारतीय कायद्यात स्पष्ट म्हटले गेले आहे.
दरम्यान 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींच्या हक्काबाबत मोठा निर्णय दिलाय. त्यावेळी न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी लग्नाच्या वेळी हुंडा दिला तरी मुलीचा कौटुंबिक मालमत्तेवरील हक्क हिरावला जाणार नाही, असे म्हटले होते.
त्यावेळी माननीय न्यायालयाने एका प्रकरणात मुलीच्या मालमत्तेचा हिस्सा तिच्या भावांना तिच्या संमतीविना हस्तांतरित करण्याचा करार रद्द केला होता. न्यायमूर्ती सोनक यांनी आपल्या निर्णयात म्हटले होते की, घरातील मुलीला हुंडा दिल्याचा कोणताही पुरावा नाही.
हे प्रकरण असो किंवा इतर कोणतेही मुलीला काही हुंडा दिला असला तरी त्याचा अर्थ कुटुंबाच्या मालमत्तेत मुलींचा अधिकार नाही असे होत नाही. म्हणजेच मुलीला लग्नामध्ये हुंडा दिला असला म्हणून तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील तिचा अधिकार नाहीसा होत नाही. मुलीला हुंडा दिला असला तरी देखील तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावाप्रमाणेच समान अधिकार मिळतो.