Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अवघ्या काही मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना तासंतास ट्रॅफिक जॅममध्ये अडकून बसावे लागते. पण भविष्यात पुण्यातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होणार आहे.
कारण की मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. वाहतूक कोंडी कमी व्हावी या अनुषंगाने पुण्यात मेट्रो सुरू करण्यात आली असून सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महा मेट्रो कडून या मार्गांवर मेट्रोचे संचालन केले जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही मार्गांचा विस्ताराचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाच्या कामांना मंजुरी सुद्धा मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते निगडी या दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार असून या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या मार्गाचे काम देखील सुरू झाले आहे.
तसेच स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या प्रकल्पाचे काम देखील पुढे सरकले आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आलीये.
कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच वर्क ऑर्डर दिली जाईल आणि या मार्गाचे देखील काम सुरू होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार असून वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय.
विशेष बाब अशी की, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्यात सात प्रस्तावित मार्गांचा समावेश आहे, यातील अनेक मार्ग केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.
हा १.२ किमी लांबीचा मार्ग राहील अन यावर दोन स्थानके असतील. रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी दरम्यानही ११.६३ किमी लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार असून यावर ११ स्थानके असतील.
खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी दरम्यानही २५.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आणि यावर २२ स्थानके असतील. तसेच, SNDT-वारजे-माणिकबाग दरम्यान ६.१२ किमी लांबीचा मार्ग तयार होणार असून या मार्गावर ६ स्थानके राहणार आहेत.