Pune News : श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील स्वामीभक्त मोठी गर्दी करतात. या ठिकाणी दरवर्षी लाखो स्वामीभक्त दर्शनासाठी येतात. पुणे जिल्ह्यातून अक्कलकोट ला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय पुणे जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांमधील भाविकांसाठी दिलासादायी ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मंचर या बसस्थानकातून श्रीक्षेत्र अक्कलकोट साठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण मंचर एसटी आगाराने सुरू केलेल्या मंचर अक्कलकोट बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक नेमके कसे आहे, यामुळे कोणकोणत्या गावांमधील भाविकांना दिलासा मिळणार ? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कधी सुरू झाली मंचर अक्कलकोट बस सेवा ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मंचर एसटी आगाराने मंचर अक्कलकोट बस सेवा अकरा मे 2025 पासून सुरू केली आहे. दरम्यान मंचर एसटी आगाराच्या या निर्णयामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 40 गावांमधील भाविकांना फायदा होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
खरे तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव जुन्नर भोसरी इत्यादी परिसरात श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थरायांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या परिसरातून श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या उल्लेखनीय असल्याचे पाहायला मिळते.
पण असे असताना सुद्धा या परिसरातून थेट अक्कलकोट ला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती आणि हीच गोष्ट पाहता या बससेवेसाठी काही लोकांनी पाठपुरावा सुरू केला होता.
पुणे जिल्ह्यातील या परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तांना अक्कलकोट येथे जाण्यासाठी थेट बस नव्हती आणि परिणामी येथील भाविकांना पुणे येथे जाऊन दुसऱ्या एसटी बसने अक्कलकोट येथे जावे लागत होते. यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि यामुळे भाविकांनी या परिसरातूनच थेट बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी आग्रही मागणी उपस्थित केली होती.
याच भाविकांच्या आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अक्कलकोट एसटी बस सेवा सुरू करण्याची सूचना मंचर आगाराला केली आणि मंचर आगाराने देखील वेळ न घालवता मंचर – अक्कलकोट बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
कस आहे वेळापत्रक ?
मंचर आगाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंचर-अक्कलकोट ही बस मंचर एसटी बस स्थानक येथून सकाळी नऊ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी पाच वाजता श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे पोहोचणार आहे. ही गाडी मंचर बस स्थानकातून सुटल्यानंतर वाकडेवाडी, स्वारगेट, सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे पोहोचणार आहे.
या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोट येथून सकाळी सात वाजता सोडली जाणार आहे आणि पुणे मार्गे मंचर येथे दुपारी तीन वाजेपर्यंत पोहचणार अशी माहिती समोर आली आहे.