Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी पुणे रिंग रोड सारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये उड्डाणपूल देखील विकसित केले जात आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून शिवाजीनगर येथे आणखी एक उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे.

कसा असणार नवा उड्डाणपुल?
मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेने शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपूल विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव देखील स्थायी समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.
खरतर शिवाजीनगर परिसरात आधीपासूनच तीन उड्डाणपूल आहेत. पाटील इस्टेट, सीओईपी चौक आणि शेतकी महाविद्यालय येथे उड्डाणपूल विकसित करण्यात आले आहेत. मात्र शिवाजीनगर व वाकडेवाडी परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेष करून गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, नरवीर तानाजीवाडी, वाकडेवाडी रस्त्यावर अधिक वाहतूक कोंडी होते. कारण साखर संकुल ते जुना मुंबई पुणे महामार्ग यादरम्यान अरुंद भुयारी मार्ग आहे. याचा वापर मोठ्या वाहनांना करता येत नाही परिणामी येथे वाहतूक कोंडी होते.
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून साखर संकुल ते जुना मुंबई पुणे रस्ता यादरम्यान उड्डाणपूल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे साखर संकुल पासून रेल्वे मार्ग ओलांडून थेट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने हा उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे.
दरम्यान महापालिकेने या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. या अनुषंगाने महापालिकेकडून तांत्रिक सल्लागार नेमण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी वर्ग करण्यात आला आहे.
आता स्थायी समितीकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती होणार आहे आणि मग तांत्रिक सल्लागारकडून या उड्डाणपुलाचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल.
या उड्डाणपुलाची एक लेन ही वाकडेवाडीच्या दिशेने जाईल आणि एक लेन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने जाणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे. पण याचा आराखडा कधी तयार होणार आणि प्रत्यक्षात हा उड्डाणपूल कधी विकसित होणार? हे पाहणे अधिक उत्सुकतेचे राहील.