Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुण्यात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
मेट्रो सोबतच पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार असून या प्रकल्पासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित असणाऱ्या पुणे रिंग रोड चे काम एकूण दोन टप्प्यात आणि नऊ पॅकेज मध्ये पूर्ण होणार आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून कंत्राटदार सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरा भोवती साकारण्यात येणाऱ्या रिंग रोडसाठी पश्चिम भागात 96% जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल. पुण्यातील रिंग रोडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची लवकरच आढावा बैठक होणार आहेत.
ही आढावा बैठक येत्या एक-दोन दिवसात होईल असा अंदाज आहे. त्याबैठकीनंतर मग रिंग रोडचं भूमिपूजन कधी होणार ? हे निश्चित होणार आहे. पण या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन जवळपास अंतिम झाले असल्याने लवकरच या प्रकल्पाच्या कामाची भूमिपूजन होण्याची अशा व्यक्त होत आहे.
याबाबत नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती 169 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता विकसित होणार आहे.
हा रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहे. रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम दोन भागात होईल आणि पश्चिम भागातील जवळपास 90% पेक्षा जास्त भूसंपादन पूर्ण झाले आहे.
पूर्व भागातील भूसंपादनाला देखील गती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाचे प्रत्यक्षात भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनाची तारीख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत ठरवली जाईल.